आंदोलक शेतकऱ्यांकडून आज 'गल्ली ते दिल्ली बंद'ची हाक ; देशभर अभूतपूर्व सुरक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने आज भारत बंदची हाक दिली आहे.

नवी दिल्ली :  केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने आज भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन केले जाईल. शेतकरी नेते व सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेची पुढील फेरी ९ डिसेंबरला उद्या होणार असून आजच्या  बंदला मिळणाऱ्या प्रतिसादावर केंद्राची पुढील भूमिका बऱ्याच अंशी अवलंबून असेल असे दिसते. 

 

केंद्र सरकार व शेतकरी नेत्यांमधील याआधीच्या पाच चर्चांतून काहीही तोडगा निघू शकलेला नसून "कायद्याचे बोला'' ही एकमेव मागणी अत्यंत एकजुटीने लावून धरणाऱ्या शेतकऱ्यांनी तीनही कायदे रद्द करणार की नाही या एकाच मुद्यावर "हो किंवा नाही'' असे स्पष्ट उत्तर सरकारकडून मागितले आहे. यापूर्वीच्या पाचही वेळच्या चर्चांमध्ये कायदे रद्द करण्यास सरकारने ठाम नकार दिला होता.  

शेतकरी नेत्यांचे आवाहन

सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याने लोकांनी सकाळीच कार्यालयांत पोहोचावे व चारनंतर घरांकडे परतावे असे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले. दिल्लीतील काही रिक्षा व टॅक्‍सी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या दिल्लीकरांची मोठी गैरसोय होऊ शकते. जीवनावश्‍यक वस्तू व भाजीपाला यांच्या पुरवठ्यावरही उद्या गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मालवाहतूकदारांनी याआधीच बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

गाड्यांची तपासणी

दिल्लीतील सार्वजनिक सेवेलाही बंदचा  फटका बसण्याची चिन्हे असून दिल्ली मेट्रो व डीटीसीच्या अधिकाऱ्यांनी आज बंदबाबत बैठका घेतल्या. भारत बंददरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रचंड तयारी केली आहे. दिल्लीतील प्रमुख रस्त्यांवर व सीमाभागांत पोलिस व निमलष्करी दलांचे हजारो सशस्त्र जवान आज सकाळपासून तैनात आहेत. जागोजागी गाड्यांची कसून तपासणी सुरू आहे.

 राजकीय एकजूट 

उद्याच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बहुतांश विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. कॉंग्रेस व डाव्या पक्षांबरोबरच आप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती,  सपा, बसपा, द्रमुक आदी किमान २० पक्ष व देशव्यापी ११ कामगार संघटनांनीही भारत बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पंजाब, हरियाना, आसाम, ओडिशा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, तमिळनाडू व दिल्ली आदी राज्यांतूनही बंदला पाठिंबा मिळत आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी बोलाविलेल्या उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुरक्षा बंदोबस्त वाढविण्याचे आवाहन केले आहे. या बंद दरम्यान शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहायला हवी, असे केंद्राकडून आज जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन केले जावे असेही यात म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घ्यायला जाणाऱ्या तीस खेळाडूंना आज पोलिसांनी रोखले.

 

"केंद्राचे कृषी कायदे शेतकरी हिताचेच आहेत. विरोधक हे दुतोंडी आहेत.  यूपीए सरकार दहा वर्षांपासून जे करू पाहत होते तेच भाजपने केले आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये बाजार समित्या कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनीही बाजार समित्या सुधारणांचा आग्रह  धरला होता."
- रविशंकरप्रसाद, केंद्रीय मंत्री

 

काल दिवसभरातील घडामोडी

  •     केजरीवाल आंदोलकांच्या भेटीस
  •     अखिलेश यादव यांना रोखले
  •     ‘झामुमो’चा शेतकऱ्यांना पाठिंबा
  •     विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी, जंतरमंतरवर आंदोलन
  •     शेतकऱ्यांच्या भारत बंदला बसपचा पाठिंबा

 

 

 

संबंधित बातम्या