पोटनिवडणूकांच्या निकालावर दिग्गजांचे भवितव्य अवलंबून

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

मध्य प्रदेशमधील २८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निकालावर भाजप सरकारचेच नाही तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, कमलनाथ आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे या तीन प्रादेशिक नेतृत्वाचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

भोपाळ :  मध्य प्रदेशमधील २८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निकालावर भाजप सरकारचेच नाही तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, कमलनाथ आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे या तीन प्रादेशिक नेतृत्वाचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

राज्यात यंदा या तीन प्रभावी नेत्यांभोवती रंगलेले राजकीय नाट्य पाहायला मिळाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील २२ बंडखोर आमदारांनी राजीनामा देत शिंदे यांना समर्थन दिले. यामुळे कमलनाथ सरकार १५ महिन्यांतच पायउतार झाले आणि भाजपला सत्तास्थापनेची संधी मिळाली. शिवराजसिंह यांनी विक्रमी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पोटनिवडणुकांमध्ये १५ जागांवर भाजपला विजय मिळाला तर शिवराज चौहान यांचे पक्षातील स्थान आणखी बळकट होईल, असे मत व्यक्त होत आहे. पोटनिवडणुकांमध्ये वरिष्ठांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा  आहेत. 

कमलनाथ यांची कसोटी
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यापुढे पोटनिवडणुकीत चांगली कामगिरी दाखविण्याचे आव्हान आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या अनुपस्थितीत कमलनाथ यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नाही तर कमलनाथ यांचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते या पदांना ‘एक व्यक्ती-एक पद’ या नियमानुसार आव्हान दिले जाऊ शकते, अशा शक्यता ‘सोनिया ए बायोग्राफी’ या पुस्तकाचे लेखक रशीद किडवाई यांनी वर्तविली आहे.

संबंधित बातम्या