देशातील कोरोना लशीची पुण्यात पहिली मानवी चाचणी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

देशातील १४ केंद्रांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. त्यात पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटल, ससून रुग्णालय, केईएम आणि जहांगीर रुग्णालयाचा समावेश आहे.

पुणे: कोरोना प्रतिबंधक लशीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये बुधवारी (ता. २६) होणार आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन लस निर्माण केली आहे. त्यासाठी चिंपांझीतील अँडिनो व्हायरसशी बायो इंजिनिअरिंगच्या माध्यमातून संयोग करून ही लस तयार करण्यात आली आहे. पुण्यात तयार होणाऱ्या लशीची पहिली चाचणी पुण्यातच होत असल्याचे या निमित्ताने पुढे येत आहे. 

पुण्यातील चार रुग्णालये
देशातील १४ केंद्रांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. त्यात पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटल, ससून रुग्णालय, केईएम आणि जहांगीर रुग्णालयाचा समावेश आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘चाचणीत सहभागी होणाऱ्या पाच स्वयंसेवकांची तपासणी केली आहे. त्यांची अँटिजेन आणि अँटिबॉडी चाचणीही केली आहे. या सगळ्याचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना सध्या कोरोनाचा संसर्ग नाही आणि यापूर्वीही तो झालेला नाही, हे अधोरेखित होईल. त्यानंतरच त्यांना कोविशिल्ड ही लस देण्यात येईल.’

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या