मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

विशेष मागस प्रवर्गातील (एसईबीसी) आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

मुंबई: विशेष मागस प्रवर्गातील (एसईबीसी) आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये ॲड. आशिष गायकवाड, ॲड. राजेश टेकाळे, ॲड. रमेश दुबे पाटील, ॲड. अनिल गोळेगावकर व ॲड. अभिजित पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य सरकारच्या वकिलांना माहिती देईल, असेही ते म्हणाले.

पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन
मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांचे  घटनापीठ स्थापन केले आहे. यामध्ये न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट आणि न्या. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. यापूर्वी आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या न्यायाधीशांचाही यामध्ये समावेश आहे. येत्या ता. ९ रोजी दुपारी दोन वाजता याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या