पाच राफेल भारताकडे झेपावले

PTI
मंगळवार, 28 जुलै 2020

उद्या पोचणार; हवेतच इंधन भरणार, यूएइमध्ये एक थांबा

नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य आणखी वाढणार असून फ्रान्सच्या मेरिनेक हवाईतळावरून बहुप्रतिक्षित पाच राफेल लढाउ विमाने आज भारताकडे रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा पल्ला पार करुन या विमानाचा पहिला जत्था बुधवारी २९ जुलै रोजी दाखल होणार आहे. हवेतच विमानात इंधन भरण्यात येणार आहे. तसेच वैमानिकांना आराम मिळावा यासाठी हे विमान यूएई येथे थांबणार आहे. कोरोना संसर्गामुळे राफेल विमानाच्या उपलब्धतेस विलंब झाला. डिसेंबर २०२१ पर्यंत राफेलचा शेवटचा संच मिळण्याची शक्यता आहे.
मेरिनेक हवाई तळावर भारताचे राजदूत जावेद अशरफ उपस्थित होते. यावेळी त्यांनी वैमानिकांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी फ्रान्स एअरफोर्स आणि राफेलची निर्मिती करणारे डसॉल्ट कंपनीचे आभार मानले. भारताने फ्रान्ससमवेत २०१६ रोजी ५८ हजार कोटीचा राफेल लढाउ विमानाचा खरेदी करार केला. एकूण राफेलच्या ३६ विमानापैकी ३० लढाउ विमान असणार आहेत तर अन्य ६ प्रक्षिणार्थी विमान असतील.
अंबाला येथे तैनात करणार
पाच राफेल विमानांना अंबाला येथे तैनात करण्यात येणार आहे. पश्‍चिम सीमेवर पाकिस्ताविरुद्ध तातडीने कारवाईसाठी हवाई दलाने अंबाला हवाई तळाची निवड केली आहे. विशेष म्हणजे अंबाला हवाई तळावरून चीनची सीमा देखील २०० किलोमीटर अंतरावर आहे. अंबाला येथे १७ व्या स्क्वाड्रन गोल्डन एरोज राफेलची पहिली स्क्वाड्रन असणार आहे. तत्पूर्वी मिराज २००० भारतात आणताना अनेक ठिकाणी थांबवण्यात आले होते. परंतु राफेल मात्र एका थांब्यानंतर थेट अंबाला हवाईतळावर उतरणार आहे.
अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम
राफेल विमान डीएच (टू-सीटर) आणि इएच (सिंगल सीटर) प्रकारात आहे. दोन्हीत दोन इंजिन, डेल्टा विंग, सेमी स्टिल्थ कॅपेबिलिटी असून चौथ्या श्रेणीतील हे विमान मानले जाते. या विमानातून अण्वस्त्र हल्ला देखील करता येऊ शकतो. यात संगणक यंत्रणा असून ती वैमानिकाला संचलन आणि नियंत्रण करण्यास मदत करते.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या