सुटकेचा निश्वास! तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान

सुटकेचा निश्वास! तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान
SpiceJet

कोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा संपर्क उड्डाण घेतल्याच्या अर्ध्या तासानंतर तुटल्याची माहिती मिळत आहे. यानंतर पुन्हा मध्यरात्री दीड तासानंतर विशाखापट्टणमच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) सोबत या विमानाचा संपर्क पूर्ववत झाल्याचे समजते. मात्र यावेळी विमान सुमारे दीड तास बेपत्ता राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट विमानाने शनिवारी रात्री 12:15 वाजता कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 50 प्रवाशांसह चेन्नईसाठी उड्डाण केले. आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर या विमानाचा संपर्क तुटला. 

कोलकात्याहून उड्डाण केल्यानंतर लहान क्यू -400 विमान 24,000 फूट उंचीवर उड्डाण करत होते. भुवनेश्वर येथून काही अंतरावर रात्री 12:48 वाजता एटीसी विमानाचा अचानक संपर्क तुटला. वास्तविक पायलट आणि एटीसी यांच्यात उंची, विमानाचा वेग, हवामान आणि आपत्कालीन परिस्थितीबद्दल सातत्याने संवाद होत असतो. रडारच्या माध्यमातून एटीसीला मॉनिटरवर विमानाची चित्रे दिसत असतात. आणि त्यावरूनच एटीसी विमानाच्या पायलटला सर्व निर्देश देत असतात. यावेळेस विमानाशी संपर्क तुटल्यानंतर एटीसीने आपत्कालीन परिस्थितीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यात एटीसीला यश आले नाही. 

याशिवाय, एटीसीने पुन्हा देशातील उड्डाण भरलेल्या सर्व विमानांशी संपर्क साधून स्पाइसजेटच्या विमानाशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. परंतु यात देखील अपयश आले. त्यामुळे कोलकाताच्या एटीसीने इतर सर्व विमानतळांना यासंदर्भात सूचित केले. नेहमी कोलकात्याहून चेन्नईसाठी जाणारे विमान पहिल्यांदा उड्डाण भरल्यानंतर कोलकाता एटीसीसोबत संपर्क ठेवते. त्यानंतर मग विशाखापट्टणमसोबत व पुन्हा कोलकाता एटीसीशी संपर्क ठेवते. यानंतरच विमान लँड होते. 

यानंतर, सततच्या प्रयत्नानंतर स्पाइसजेट विमानाने विशाखापट्टणम विमानतळाच्या एटीसीशी रात्री अडीच वाजता पुन्हा संपर्क स्थापित केला. त्यानंतरच एटीसीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर, नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) या घटनेचा तपास सुरु केला आहे. कारण विमान सुमारे दीड तास संपर्कात नसल्याने ही एक सामान्य घटना नाही. याशिवाय, डीजीसीएने स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर सोमवारी विमान मंत्रालयाला याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला. तर, रेडिओ संचार संपर्क तुटल्यामुळेच विमानाचा संपर्क देखील तुटल्याचा प्राथिमक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.        

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com