भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज दु:खद निधन झाले.

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे आज दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या असून ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक नेते होते.

दरम्यान, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, ‘जसवंत सिंह यांनी परिश्रमपूर्वक भारताची सेवा केली. राजकारण आणि समाजकारण या विषयांबद्दलच्या त्यांच्या अनोख्या दृष्टीकोनासाठी ते लक्षात ठेवले जातील’.

जसवंत सिंहांविषयी काही महत्वाचे- 
•    लष्करामध्ये महत्वाच्या पदावर नोकरी केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 
•    भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक नेता, अशी त्यांची पक्षात ओळख आहे. 
•    अटलबिहारी यांच्या एनडीए सरकारमध्ये १९९६ ते २००४ या काळात त्यांनी संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली.
•     या काळात त्यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती.
•     त्यांना वादविवादांचा सामनाही अनेकदा करावा लागला.   
•    विशेषत: १९९६ मध्ये कंधार विमान अपहरणावेळी प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी दहशतवाद्याला सोडायला गेल्याने टीकेचा सामनाही करावा लागला होता. 
•    एनडीएचे सरकार गेल्यावर २००४  ते २००९ या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही लीलया पेलली.
•     गोरखालँडची मागणी करणाऱ्या दार्जिलिंगमधील स्थानिक पक्षांच्या पाठिंब्यावर ते लोकसभेवर निवडून गेले होते.

 

संबंधित बातम्या