गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

केशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता. सन 1995 आणि 1998 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, 2001 साली त्यांना आपले पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

अहमदाबाद-  गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले होते. कोरोनावर मात करून ते बरेही झाले होते. मात्र, आज अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. 

केशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता. सन 1995 आणि 1998 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, 2001 साली त्यांना आपले पदावरून पायउतार व्हावे लागले होते. सलग सहावेळा विधान सभेवर निवडून गेलेले केशुभाई हे भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासाठी काम करत होते. मात्र, 2012 साली त्यांनी भाजपमधून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन केला. २०१२च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विसावदर मतदारसंघातून जनतेने निवडूनही दिले. मात्र,  प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी २०१४मध्ये आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील मातब्बर नेत्यांमध्ये त्यांची कायमच गणना केली जात होती.  

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी केशुभाई पटेल यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले. 

 

संबंधित बातम्या