माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

प्रणव मुखर्जी हे १० ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल होते. मेंदूतील रक्ताच्या गाठीच्या शस्त्रक्रियेनंतर ते बेशुद्धीत होते. त्यांच्या मागे पुत्र इंद्रजित, अभिजित व कन्या शर्मिष्ठा आहेत.

नवी दिल्ली: भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे आज येथील लष्करी रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी त्यांचे पुत्र अभिजित यांनी ट्‌वीटद्वारे ही माहिती दिली. मुखर्जी हे १० ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल होते. मेंदूतील रक्ताच्या गाठीच्या शस्त्रक्रियेनंतर ते बेशुद्धीत होते. त्यांच्या मागे पुत्र इंद्रजित, अभिजित व कन्या शर्मिष्ठा आहेत. भारतीय राजकारण, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि भारतीय राज्यघटनेचा विकास हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते आणि त्या विषयांबाबतचे ते चालते-बोलते संदर्भग्रंथ होते. त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 

मूळ प्राध्यापकी पेशा असलेल्या प्रणव मुखर्जींना इंदिरा गांधी यांनी हेरले आणि राष्ट्रीय राजकारणात आणले. पश्‍चिम बंगालमधील अजय मुखर्जी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे कनिष्ठ मंत्री होते. परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांना १९६९ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसतर्फे तिकीट देऊ केले.

राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीला वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले. नंतरच्या काळात आणीबाणी लागू झाल्यानंतर भारतीय राजकारणात एक वेगळेच पर्व सुरू झाले परंतु, मुखर्जी हे इंदिरा गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळेच मग त्यांना अर्थमंत्रिपद आणि राज्यसभेचे नेतेपद देण्यात आले. त्यांनी इंदिरा गांधी यांचा एवढा विश्‍वास संपादन केला होता की, त्या परदेश दौऱ्यावर जात तेव्हा सरकारची सूत्रे त्यांच्याकडे असत. म्हणजेच कॅबिनेटची बैठक इंदिरा गांधी यांच्या अनुपस्थितीत घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असत. इंदिरा गांधी यांच्या काळातच ते क्रमांक दोनचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.

इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांच्या काळात एका चुकीमुळे मुखर्जी यांना कॉँग्रेस व राजीव गांधी यांच्या राग व नाराजीचे बळी व्हावे लागले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान कोण या मुद्यावर मुखर्जी यांनी सर्वांत वरिष्ठ किंवा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्याकडे सूत्रे दिली जावीत असे मत व्यक्त केले होते. 

भारतरत्न प्रणवदा यांनी आमच्या देशाच्या विकासाच्या मार्गावर स्वतःचा अमीट ठसा उमटवला. एक विद्वान, एक राजकीय नेते त्यांच्या भूमिकेबद्दल समाजाच्या सर्व वर्गांमधून त्यांना कायम प्रशंसेची पावती मिळाली. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आमचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त राष्ट्राला शोकाकुल करणारे आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर मनाला अतीव दुःख झाले. त्यांनी राष्ट्र व समाज यांची केलेली सेवा अतुल्य अशीच आहे. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. गोवा त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

प्रणबदांच्या निधनाने भारतमातेचा एक तेजस्वी सुपुत्र गेला. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. सुमारे पाच दशके भारत देशाला मजबूत करण्यासाठी वावरलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यास माजी मानवंदना. त्यांची कन्या शर्मिष्ठा, सुपुत्र अभिजित व कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.  - दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या