‘एनएटीएमओ’च्या वतीने कोविड-19 डॅशबोर्डची चौथी आवृत्ती

pib
मंगळवार, 7 जुलै 2020

‘नॅटमो’च्या  http://geoportal.natmo.gov.in/Covid19/ अधिकृत पोर्टलवर कोविड-19 डॅशबोर्डची चौथी अद्ययावत आवृत्ती दि. 19 जून, 2020 रोजी जारी करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली,

भारत सरकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘एनएटीएमओ’ म्हणजेच 'नॅशनल अॅटलस अँड थेमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन'- ‘नॅटमो’च्या  http://geoportal.natmo.gov.in/Covid19/ अधिकृत पोर्टलवर कोविड-19 डॅशबोर्डची चौथी अद्ययावत आवृत्ती दि. 19 जून, 2020 रोजी जारी करण्यात आली आहे. 

कोविड-19च्या या चौथ्या आवृत्तीमध्ये काही नवीन गुणवैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. जसे की:- 

1) वापरकर्त्याला एकाच नकाशामध्ये कोविड-19 विषयी विस्तृत माहिती मिळू शकणार आहे.

(आकृती 1- एकल नकाशा चौकट- कोविडची आकडेवारी आणि आरोग्य सुविधा) 

2) कोविड आकडेवारी- कोविड रूग्णांची नेमकी संख्या, आजारातून बरे झालेल्यांची संख्या, रूग्ण, बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर यांची माहिती राज्य आणि जिल्हावार देण्यात आली आहे. तसेच आरोग्य सुविधांविषयीची माहिती, जसे की- रूग्णालये, चाचणी प्रयोगशाळा, रक्तपेढ्या यांचीही माहिती याच नकाशाच्या चौकटीत देण्यात आली आहे. 

 
(आकृती 2- राज्यनिहाय कोविडची आकडेवारी यामध्ये बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर यांची माहिती दिली आहे, हे प्रमाण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे काढण्यात आले आहे.) 

3) वापरकर्त्यासाठी सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ‘ड्रिल डाऊन’ दृष्टिकोनातून ती देण्यात आली आहे. कोविडविषयी माहिती जाणून घेताना राज्य आणि जिल्हा निवड केल्यानंतर त्या जिल्ह्यातली सर्व माहिती डॅशबोर्डवर दिसू शकणार आहे. आरोग्य सुविधा कुठे आहेत, हेही समजणार आहे. वापरकर्त्याला जर वैयक्तिक स्तरावर आरोग्य सुविधा हव्या असतील तर, वरच्या बाजूला त्या देण्यात आल्या आहेत. तसेच रूग्णालयाचा नेमका पत्ता, त्याची वर्गवारी काय आहे, अशी उपयोगी माहितीही या डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. माहिती देताना चित्रांचा वापर करण्यात येऊन ती ताबडतोब समजेल, याची सुविधा करण्यात आली आहे. 


(आकृती 3 - महाराष्ट्र राज्याची कोविडची आकडेवारी तसेच उपचारासाठी आरोग्य सुविधा कुठे उपलब्ध आहेत, त्या रूग्णालयाचे नेमके स्थान. कोविडविषयीची आकडेवारी यामध्ये आजारी पडलेल्यांची संख्या, बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर, गेल्या 15 दिवसात कोविडची नेमकी काय स्थिती आहे, हे स्पष्ट करणारा आलेख अशी सर्व माहिती दिली आहे. )

4) राज्यात गेल्या 14 दिवसात कोविडची नेमकी काय स्थिती आहे, हे आलेखाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या दोन राज्यांमध्ये जास्त कोविड रूग्णांची संख्या आहे, त्यांची नावे क्रमवारीत ‘बाय डिफॉल्ट’ सर्वात वरती दर्शविली जात आहेत. वापरकर्त्याला ‘ड्रॉप-डाउन’मधून इतर कोणत्याही राज्याची निवड करून माहिती पाहता येणार आहे.

कोविड महामारीने आता संपूर्ण जगभरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. जगातले 217 देश कोविडच्या विरोधात लढा देत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. दि. 30 जानेवारी, 2020 रोजी भारतामध्ये कोविडची लागण झालेला पहिला रूग्ण सापडला होता. त्यादिवसापासून सरकार सातत्याने धोक्याचा इशारा देत असून, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोविड नियंत्रणाने सरकारने अनेक महत्वपूर्ण उपाय योजना केल्या आहेत. कोविडमुळे देशातल्या सामुदायिक-सामाजिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये, म्हणूनही सरकारने पुढाकार घेतला आहे. कोविडचा प्रसार लक्षात घेऊन देशात वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये वेगाने वृद्धी केली आहे. असेच आलेल्या संकटामुळे घाबरून जाऊ नये व समाजात अस्वस्थता निर्माण होऊ नये, सामाजिक वर्तन नियंत्रणात असावे, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. 

सध्याचा अतिशय नाजूक काळ लक्षात घेवून कोविड-19 विषयी भारतामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, हे सर्वांना जाणून घेता यावे, तसेच अधिकृत आकडेवारी माहित व्हावी, यासाठी सरकारच्या सर्व खात्यांकडून येणारी माहिती एकत्रित करून एकल खिडकीअंतर्गत ‘एनएटीएमओ’ने या डॅशबोर्डची निर्मिती केली केली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्वात प्रथम तयार केलेल्या कोविड-19 डॅशबोर्डच्या माध्यमातून दि. 14 एप्रिल, 2020 पासून सर्वांना माहिती दिली जाऊ लागली. यामध्ये फक्त कोविड प्रकरणाची राज्य आणि जिल्हानिहाय आकडेवारी देण्यावर आधी लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. परंतु डॅशबोर्डच्या माध्यमातून जनतेला आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची माहिती देण्याची तरतूदही करण्यात आली. त्यामुळे लोकांना या डॅशबोर्डचा उपयोग होऊ लागला. 

पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डमध्ये वेळोवेळी माहिती विषयानुरूप अद्ययावत करण्यात येऊ लागली. तसेच कोविडची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन त्यामधून जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल, याचा विचार करण्यात आला व आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात आले. कोविड-19 महामारीची स्थिती खूप कमी कालावधीत अतिशय झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे त्यामागच्या कारणांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर  भौगोलिक-सामाजिक-आर्थिक घटकांचा विचार करणे, यातून येणारे वेगळे विश्लेषण ही महामारी रोखण्यासाठी निश्चितच मदत करू शकते. तसेच भविष्यामध्ये यासारख्या रोगांविरुद्ध लढा नेमका कसा देता येईल, याचे नियोजन आधीपासून करणे शक्य होणार आहे. 

संबंधित बातम्या