कुख्यात गुंड विकास दुबे चकमकीत ठार

PTI
शुक्रवार, 10 जुलै 2020

कानपूर टोलनाक्याजवळ एन्काऊंटर; पक्ष नेत्यांकडून प्रश्‍नांची सरबत्ती

कानपूर

आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळ्या घालणारा कुख्यात गुंड विकास दुबे आज सकाळी एसटीएफ आणि पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. कानपूर टोलनाक्यावरून २५ किलोमीटर अंतरावर दुबेला घेऊन जाणारी विशेष कृती दलाची गाडी उलटली. यादरम्यान तो पोलिसाकडील बंदूक हिसकावून घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याचे सकाळी ७.१५ ते ७.३५ च्या सुमारास इन्काऊंटर केले. या अपघातात नवाबगंज येथील निरीक्षकासह चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. दरम्यान बसपच्या नेत्या मायावती यांनी आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येची आणि विकास दुबेच्या चकमकीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या गुरुवारी रात्री बिकरु या गावी कुख्यात गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता त्याने बेसावध असलेल्या पोलिसांवर बेछुट गोळीबार केला. त्यात आठ पोलिस कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यानंतर पोलिसांनी विकास दुबेला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याच्या पाचही साथीदाराचे इन्काऊंटर केले. तसेच बक्षीसाची रक्कमही वाढवली. परंतु तो हाती लागत नव्हता. नेपाळ सीमेवरही त्याचे पोस्टर लावले होते. त्याच्या शोथार्थ लगतच्या राज्यात पथके रवाना केली होती. यादरम्यान गुरुवारी तो उज्जैनच्या महाकाल मंदिरात आल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार कारवाई करत दुबेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी मध्यप्रदेश पोलिसांनी दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली केले.
असे झाले एन्काउंटर
आज सकाळी स्पेशल टाक्स फोर्सच्या गाडीतून दुबेला कानपूरला आणण्यात येत होते. परंतु पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने कानपूर टोल प्लाझापासून २५ किलोमीटर अंतरावर संचेंदी भागात वेगात असलेली एसटीएफची मोटार घसरली. या अपघातात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांकडून पिस्तुल हिसकावले आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळापासून काही अंतरावर दुबे आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. यात विकास दुबे गंभीर जखमी झाला. तसेच एसटीएफचा जवान जखमी झाला. त्यांना जखमी अवस्थेत स्ट्रेचरवर लाला लजपत राय रुग्णालयात आणण्यात आले. दुबेवर उपचार सुरू असताना निधन झाले.
दुबेच्या छातीत गोळ्या घुसल्या
डॉक्टर म्हणाले, की दुबेच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या. यावेळी दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांच्याही हाताला गोळी लागली. प्रत्यक्षदर्शीच्या मते, आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला. गाडीला अपघात झाला नाही, पण गोळीचा आवाज ऐकला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावले. आम्ही तेथून निघून गेलो. पण आम्ही गोळ्याचा आवाज ऐकला, असे त्यांनी सांगितले.

मोटार नाही उलटली, सरकार उलटण्यापासून वाचवले
कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरवरून राजकीय नेत्यांनी आरोपांच्या आणि प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, प्रत्यक्षात मोटार उलटली नाही तर गुपित उघडे होण्याअगोदरच इन्काऊंटर झाले आणि सरकार कोसळण्यापासून वाचवण्यात आले.यापूर्वी देखील अखिलेश यांनी दुबेच्या अटकेवरून प्रश्‍न उपस्थित केले होते. दुबेची शरणागती आहे की अटक हे सरकारने सांगावे, असा सवाल योगी सरकारला केला होता.

गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांचे काय
विकास दुबेच्या चकमकीवरून कॉंग्रसेच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील प्रश्‍न उपस्थित केला आहे. गुन्हेगाराचा अंत झाला आहे, मात्र गुन्हा आणि त्याला संरक्षण देणाऱ्या लोकांचे काय असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या