जनरल बिपिन रावत: दुःसाहस केल्यास पाकला फटका

प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

सरसेनाध्यक्ष : दोन्ही आघाड्यांवर लढण्याची क्षमता

नवी दिल्ली: लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्यामुळे तणाव वाढत असल्याचा गैरफायदा पाकिस्तान उठवू शकतो, पण दुःसाहस केल्यास पाक लष्कराला प्रचंड फटका सहन करावा लागेल, असा इशारा सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी दिला.

अमेरिका-भारत व्युहरचनात्मक भागीदारी व्यासपीठ आयोजीत ‘नव्या आव्हानांची दिशा़या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. चीन आणि पाकिस्तानचे सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर एकत्रित कारवाया करण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी दोन्ही आघाड्यांवरील संकटाला सामोरे जाण्याची सशस्त्र दलांची क्षमता असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. मोहीम चालवण्यासाठी मुख्य आणि दुसऱ्या क्रमांकाची आघाडी निश्चित करण्यावर लष्कराची रणनिती अवलंबून असेल.

जनरल रावत पुढे म्हणाले की, शांतता आणि स्थैर्याला चालना मिळावी म्हणून चीनबरोबर सीमा व्यवस्थापन शिष्टाचार निश्चित झाले आहेत, पण अलिकडे चीनने आक्रमक कारवाया केल्या आहेत, ज्या हाताळण्याची भारतीय लष्कराकडे पूर्ण क्षमता आहे. तिबेटच्या स्वायत्त विभागात चीन उभारत असलेल्या पायाभूत सुविधांवर भारत लक्ष ठेवून आहे. रणनिती आखताना याच्या परिणामांचा विचार केला जात आहे, सागरी आणि हवाई क्षेत्रांतील संचाराचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे म्हणून चौरंगी सुरक्षा संवादाची चांगली व्यवस्था आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्याबरोबरील ही व्यवस्था भारताने २०१७च्या अखेरीस सुरू केली. गेल्या वर्षी मंत्री पातळीपर्यंत ती वाढविण्यात आली. त्याचा फायदा झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमेरिकेशी कराराचे संकेत
भौगोलिक ठिकाणांच्या गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच एक करार होण्याचे संकेत सरसेनाध्यक्ष जनरल रावत यांनी दिले. हवाई वाहतूक, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांत उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रत्रान मिळविण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या