ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं पंतप्रधान मोदींची केली स्तुती

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या बैठकीत भाग घेतलेले व राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झालेले गुलाम नबी आझाद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या बैठकीत भाग घेतलेले व राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झालेले गुलाम नबी आझाद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमिनीशी जोडलेले नेते असल्याचे सांगत इतरांनी त्यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यशाच्या शिखरावर गेल्यानंतर देखील आपल्या मूळ जमिनीशी कसे जोडून राहता येईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून शिकण्यासारखे असल्याचे गुलाम नबी आझाद म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी चहा विकत असल्याच्या घटनेचा दाखल देताना त्यांनी आपले वास्तव लपवले नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.  

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमधील एका सभेत बोलताना, अनेक नेत्यांच्या काही गोष्टी आपल्याला आवडल्याचे सांगितले. यानंतर आपण स्वत: गावातून असून याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सांगतात गावाकडून आहे, चहा विकायचो, त्यामुळे वैयक्तिकरित्या आपण त्यांच्याविरूद्ध असलोतरी ते वास्तव लपवत नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितले. व आपण आपली वास्तविकता लपविली तर आपण मशीनच्या दुनियेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. 

''केंद्राने बनवलेले कायदे हे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट''

यापूर्वी काल झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत बोलताना बर्‍याच वर्षांनंतर जम्मू काश्मीरची उपस्थिती संसदेतील राज्यसभेत नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. तसेच, राज्याचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संसदेच्या आत आणि बाहेर लढा सुरूच राहणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी अधोरेखित केले होते. शिवाय राज्यात निवडलेले मंत्री आणि मुख्यमंत्री नसतील तोपर्यंत बेरोजगारी, रस्ते आणि शाळांची दयनीय अवस्था अशीच राहणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी काल म्हटले होते. व आपण राज्यभेतून निवृत्त झाल्याचे म्हणत, मात्र राजकारणातून निवृत्त झालो नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. 

दरम्यान, याअगोदर गुलाम नबी आझाद यांच्या सेवानिवृत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत त्यांचे कौतुक केले होते. व त्यांच्या एका आठवणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांना यावेळी अभिवादन देखील केले होते. तर, त्यावेळी गुलाम नबी आझाद देखील एका क्षणी भावुक झाले होते.      

संबंधित बातम्या