‘‘न दैन्यं न पलायनम्"...3 वेळा पंतप्रधान होऊनही कायम 'अर्जुना'च्याच भूमिकेत राहिलेला नेता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. सबंध भारतात हा दिवस आज 'सुशासन दिवस' म्हणूनही साजरा करण्यात येतो. अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या वक्तृत्वासाठी आणि राजकारणासाठी स्वपक्षातच नव्हे तर विरोधकांतही चांगलेच प्रसिद्ध होते.

नवी दिल्ली :  भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. सबंध भारतात हा दिवस आज 'सुशासन दिवस' म्हणूनही साजरा करण्यात येतो. अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या वक्तृत्वासाठी आणि राजकारणासाठी स्वपक्षातच नव्हे तर विरोधकांतही चांगलेच प्रसिद्ध होते. प्रथमच  पंतप्रधान झाल्यावर फक्त 13 दिवसांनंतर संख्याबळाअभावी त्यांना पद सोडावे लागले होते. मात्र, पदाचा राजीनामा देताना त्यांनी केलेले भाषण आजही अनेकांच्या स्मृतीत आहे.

वक्तृत्वाबरोबरच साहित्याची उत्तम जाण असलेले अटल बिहारी एक संवेदनशील कवीही होते. आपल्या कवितांमधूनही त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करून आपल्या ठायी असलेल्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे. तीनवेळा देशाचे पंतप्रधान भुषवलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी 'मेरी इक्यावन कवितांए', 'चुनी हुई कविताएँ' आणि 'न दैन्यं न पलायनम' यांसारख्या कवितांमधून अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांच्या अनेक कविता स्वकेंद्रित होत्या. तसेच स्वधर्म, स्वसंस्कृतीचा लवलेशही त्यांच्या काही कवितांमधून वाचायला मिळतो. आपल्या कवितांच्या माध्यमातूनही त्यांनी त्या त्या वेळच्या राजकारणावर भाष्य केले. त्यांच्या अशाच काही कवितांच्या बाबतीत आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू..

पंद्रह अगस्त का दिन कहता 
आज़ादी अभी अधूरी है।
सपने सच होने बाकी है,
रावी की शपथ न पूरी है।।

देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही कविता लिहिली होती. ज्यात तत्कालीन सरकारला स्वातंत्र्यानंतरही देशापुढील अडचणी कमी झाल्या नसून किंबहून त्या आणखी उग्र झाल्या आहेत, असे आपल्या कवितेतून सांगितले होते. मात्र, कवितेच्या शेवटी त्यांनी कमालीचा आशावाद उद्धृत करत पुढील काळात काय करावे लागणार आहे याबद्दलही सांगितले आहे. कवितेच्या पुढे ते म्हटले...

 उस स्वर्ण दिवस के लिए आज से
कमर कसें बलिदान करें।
जो पाया उसमें खो न जाएँ,
जो खोया उसका ध्यान करें। 

अटलबिहारी यांनी स्वत:ही त्याकाळी जनसंघमध्ये पूर्णवेळ काम करायला सुरूवात केली होती. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघचे प्रमुख नेते म्हणूनच त्यांनी काम पाहिले होते. 

पर तुम क्या जानो आजादी क्या होती है?
तुम्हे मुफ़्त में मिली न कीमत गयी चुकाई।
अंग्रेजों के बल पर दो टुकडे पाये हैं,
माँ को खंडित करते तुमको लाज ना आई? 

कायमच संवेदनशील असलेल्या भारत-पाक विभाजनावर अनेकदा बोलले गेले. लिहिले गेले. मात्र, अखंडित भारताचे स्वप्न बघणाऱ्या अटलबिहारी यांनी विभाजनानंतरच्या बेजबाबदार निर्णयकर्त्यांना चांगलीच चपराक लगावली होती. देशातील अनेक राजकीय विषयांवर थेट परंतु अतिशय सुसंस्कृत भाषेत भाष्य केले आहे. पुढे सत्ता आल्यानंतरही त्यांची ही भाषा बदलली नाही. त्यांनी स्वत:ला महाभारतातील अर्जूनाच्याच भूमिकेत बघत कायम शिष्यत्वच पत्करले. ते म्हणायचे.. 

आग्नेय परीक्षा की इस घड़ी में
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें:
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’  

 भारताच्या संसदेतील सर्वोच्च कार्यकारी पद आपल्या हातात असतानाही लोकशाही मुल्यांच्या आड सत्ता येणार नाही याची काळजी नेहमीच घेणारे अटलबिहारी वाजपेयी सत्तेत असतानाही सत्तेला कायम गौणच मानत आले होते.  

सत्ता की अनियंत्रित भूख
रक्त-पिपासा से भी बुरी है।
पांच हजार साल की संस्कृति :
गर्व करें या रोएं?
स्वार्थ की दौड़ में

केवळ तेरा दिवसांतच ज्यावेळी त्यांना आपले पद सोडावे लागले होते. त्यावेळीही त्यांनी भाषण करताना एक वाक्य उद्गारले होते ज्य़ामुळे भारतीय राजकारणातील उदारमतवादाचा एक उत्तम नमुना त्यांनी पेश केला होता. सरकार कोसळणार या भीतीने काही नेते पळत सुटतात. मात्र, वाजपेयी यांनी त्याप्रसंगालाही सामोरे जाताना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते, 'सत्ता का खेल तो चलेगा-सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियाँ बनेंगी बिगड़ेंगी-मगर ये देश रहना चाहिए इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए' .

संबंधित बातम्या