फटाक्यांची ‘आवाज’ चाचणी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

उपलब्ध फटाक्‍यांमध्ये कमी प्रदुषण करणारे हरित फटाकेच उपलब्ध नाहीत व सर्व फटाक्यांमध्ये विषारी द्रव्य कायम असल्याचे निरीक्षण आवाज फाऊंडेशनकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालावी, असे आवाहन ‘आवाज’ने केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. असे असले तरीही उपलब्ध फटाक्‍यांमध्ये कमी प्रदुषण करणारे हरित फटाकेच उपलब्ध नाहीत व सर्व फटाक्यांमध्ये विषारी द्रव्य कायम असल्याचे निरीक्षण आवाज फाऊंडेशनकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालावी, असे आवाहन ‘आवाज’ने केले आहे.

कोरोना आजारामुळे रुग्णांच्या फुप्फुसावर होणारा आघात आणि प्रदूषणातून उद्‌भवणाऱ्या घातकी श्‍वसनविकाराचा आढावा घेण्यासाठी आवाज फाऊंडेशनने ४० हून अधिक प्रकारचे फटाके बाजारातून खरेदी करून त्याची चाचणी केली. मात्र यंदा बाजारात ‘ग्रीन क्रॅकर्स’ म्हणजे हिरवे फटाके उपलब्ध नसल्याचे निरीक्षण ‘आवाज’ने मांडले. ‘ग्रीन क्रॅकर्स’ची मागणी केली असता त्याऐवजी हिरव्या रंगात फुटणारे फटाके देण्यात आले. त्या फटाक्‍यांचे प्रयोगशाळेत विश्‍लेषण केल्यावर त्यात प्रतिबंधित रासायनिक बेरियमसह असंख्य घातक रसायने असल्याचे आढळले, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलली यांनी दिली.

फटाक्‍यांच्या पर्यावरण संरक्षण अधिनियम १०८६ अन्वये ‘आवाज’ने घातक आणि विषारी रसायनांच्या यादीतील नोंदींसह रासायनिक रचनेचीही तुलना
 केली. 
गेल्या दशकभरात आवाज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संयुक्तपणे घेतलेल्या वार्षिक ध्वनिप्रदूषणाची चाचणी या वर्षी पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याने २०१९ चा अहवाल जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. अहवालात चाचणी केलेले बहुतेक फटाके अत्यंत उच्च पातळीचे ध्वनिप्रदूषण निर्माण करत असून निवासी भागात वापरण्याजोगे अजिबात नसल्याचे निरीक्षण मांडण्यात आले आहे. 

हानिकारक द्रव्यांचा समावेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेरियमच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही फटाक्‍यांमध्ये ते द्रव्य आढळले आहेत. फटाक्‍यांमध्ये सल्फर ट्रायक्‍सॉईड, व्हॅनिडियम पेंटॉक्‍साईड, पोटॅशियम ऑक्‍साईड्‌स आणि कॉपर ऑक्‍साईड्‌स, हे घातक घटक आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

तातडीने फटाक्‍यांवर बंदी घालावी
कोव्हिड काळात प्रदूषणाचा आरोग्याला धोका असून फटाके श्‍वसन आजाराच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. विशेषत: श्‍वसनाचे विकार असलेल्यांसाठी फटाके वापरणे धोकादायक असल्याने पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करावी. राज्य सरकारलाही तातडीने सर्व फटाक्‍यांवर बंदी घालण्यात यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे, असे ‘आवाज’च्या सुमेरा अब्दुलली यानी सांगितले.

संबंधित बातम्या