ब्रिटनच्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे नवे निर्देश; काय आहे नवीन नियमावली? वाचा..

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

कोरोनाच्या नव्या अवताराबद्दल केंद्राकडून दोन भागांत नवे दिशानिर्देश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्यांची तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

 

नवी दिल्ली- कोरोनाच्या नव्या अवताराबद्दल केंद्राकडून दोन भागांत नवे दिशानिर्देश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्यांची तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

ब्रिटनमधून आलेल्या १२ भारतीयांना नव्या कोरोना अवताराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यातील सहा जण दिल्ली विमानतळावर उतरले होते.  दिल्ली सरकारने ब्रिटनमधून आलेल्यांच्या घरी जाऊन साऱ्या कुटुंबीयांच्या व संबंधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची काटेकोर चाचणी केली जाईल व नंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल. त्यातून एखादा सक्रिय रूग्ण घरी गेलाच तर त्याचा पत्ता, गाव व राज्याची माहिती काढून संबंधित राज्याला त्याबाबत सावधगिरी बाळगण्यास कळविण्यात येईल. 

काय आहेत नवीन नियम? 

भाग 1 

 •     ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व विमान कर्मचाऱ्यांचीही आरटीपीसीआर चाचणी विमानतळावरच होणार 
 • संक्रमित रुग्णांना वेगळ्या विलगीकरण कक्षांत ठेवणार, त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे त्वरित पाठवून अहवाल येईपर्यंत संबंधितांना विलगीकरण कक्षाबाहेर जाण्यास मनाई 
 •  सक्रिय रुग्णांवर सध्याच्या कोरोना आरोग्य नियमांनुसार उपचार करणार. चौदा दिवसांनी पुन्हा चाचणी घेणार 
 •    सलग दोन चाचण्यांमध्ये रुग्ण निगेटिव्ह आढळला तरच त्यांना विशिष्ट अटींवर घरी जाण्यास परवानगी 
 •  दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी संबंधितांनी पुढचे किमान १४ दिवस घरातच विलगीकरणात राहावे लागेल 
 •  भारत सरकारच्या दिशानिर्देशांबाबत ब्रिटनमधून येणाऱ्यांना चेक इन करण्याआधीच माहिती देणार
 • विमानातही तशी सूचना वारंवार करणार व त्याच्या प्रती प्रत्येक प्रवाशास देणार.

भाग 2

 •    २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेणार. संक्रमितांना घरी जाण्यास परवानगी नाही. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले विमान कर्मचारी व त्यांच्या आसनाच्या मागच्या व पुढच्या तीन तीन आसनांवरील प्रवाशांनाही संपर्कशील रूग्ण मानून त्यांची काटेकोर तपासणी करणार
 •     जे प्रवासी चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आढळले त्यांची यादी संबंधित राज्यांना देऊन त्यांना घरातच विलगीकरणात राहणे सक्तीचे
 •    २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधून जे प्रवासी आले आहेत त्यांच्या कुटुंबीयांसह व संपर्कात आलेल्यांना चाचण्या करवून घेण्याचा आग्रह धरणार
 •     ९ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत विदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची यादी देशातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवून आपापल्या भागातील प्रवाशांच्या तातडीने चाचण्या करण्याची व १४ दिवसांपर्यंत त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना 
 • विमानतळावरील चाचण्यांत निगेटिव्ह आढळलेल्यांच्या  चाचण्या करणे बंधनकारक
 • ब्रिटनमधून आलेला एखादा प्रवासी कोरोना संक्रमित आढळला तर त्या रुग्णाला १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे बंधनकारक

संबंधित बातम्या