कृषी विधेयके राज्यसभेच्या वेशीवर

Government introduces farm bills in Rajya Sabha
Government introduces farm bills in Rajya Sabha

नवी दिल्ली: बहुचर्चित तीन कृषी विधेयके उद्या (ता. २०) राज्यसभेत मांडण्याचे नियोजन मोदी सरकारचे आहे. भाजप व कॉंग्रेस आघाड्यांत नसणाऱ्या पक्षांनी लोकसभेसारखीच भूमिका कायम ठेवली तर ‘भाषणांत विरोध पण मंजुरीवेळी सभात्याग करून सरकारला मदत’ असेच चित्र दिसणे शक्‍य आहे. मतविभाजन झाले तरी १०० विरुद्ध १२०-१२२ अशा फरकाने भाजप ही विधेयके राज्यसभेच्या वादळातूनही सुरक्षित तारून नेण्याची पूर्ण चिन्हे आहेत. कॉंग्रेस व भाजपने आपापल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.

कोरोना परिस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनातील दोन्ही सभागृहांतील व गॅलऱ्यांमध्येही केलेली खासदारांची आसन व्यवस्था व विविध कारणांमुळे अनुपस्थित असणारे सुमारे २० ते २५ सर्वपक्षीय खासदार, या पार्श्‍वभूमीवर चर्चा व या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी अत्यंत वादळी ठरणार आहे. खासदारांची बसण्याची व्यवस्थाच अशी आहे की आवाजी मतदानानंतरही डावे किंवा इतरांनी मतविभाजनाचा हट्ट धरला तर मतविभाजन हे यंत्रांद्वारे घेणे शक्‍य नाही. त्यामुळे मतपत्रिकांद्वारेच मतदान घ्यावे लागेल. त्यासाठीही लोकसभा सचिवालयाच्या मनुष्यबळाची मदत लागेल. 

भाजप- एनडीएकडे राज्यसभेत आजही बहुमत नाही. सत्तारुढ भाजप आघाडीतील अकाली दलाने व तेलंगण राष्ट्र समितीसारख्या मित्रपक्षांनीही या विधेयकाला विरोध जाहीर केला आहे. अकाली दल (३ खासदार) वगळता भाजपला मदत करणाऱ्या एकाही पक्षाचा विरोध ठाम दिसत नाही. 

मात्र या विधेयकांवरून वाद केवळ एनडीएमध्ये आहेत असे नव्हे, कॉंग्रेस व तृणमूलच्या संसदीय नेत्यांमध्येही वाद पेटले आहेत. सप व द्रमुकसारखे कॉंग्रेसच्या बाजूने असणारे पक्षही राज्यसभेत कॉंग्रेसला नेहमीच अनुकूल भूमिका घेत नसल्याचे या अधिवेशनात अनेकदा दिसले आहे.

 लोकसभेत सभात्याग करणाऱ्या शिवसेनेचे राज्यसभेतील संजय राऊत यांच्यासह ३ खासदार उद्या ठाम विरोधाची भूमिका घेऊ शकतात. बीजू जनता दल, बसप व तेलंगण राष्ट्र समितीने विरोधाची भूमिका ठेवली असली तरी उद्या हे पक्ष सभात्यागाचा मार्गानेच जाऊ शकतात असे सांगितले जाते. 
तेलंगणा राष्ट्र समितीच्या भूमिकेत तर लोकसभा विरुद्ध राज्यसभा असे मतभेद दिसत आहेत.

राज्यसभेतील पक्षीय बलाबल  
    बाजूने :  एनडीए : भाजप - ८६ , अण्णाद्रमुक- ९ , जदयू- ५, (बीपीएफ, एमएनएफ, एनपीपी, एपीएफ, लोकजनशक्ती पक्ष, रिपब्लिकन, एसडीएफ) - एकूण ७, (अपक्ष व नामनिर्देशित)- ६, वायएसआर काँग्रेस- ६ 
    विरोधात : यूपीए  काँग्रेस- ४०, तृणमूल- १३, समाजवादी पक्ष- ८, राष्ट्रीय जनता दल- ५, आम आदमी पक्ष- ३, (एमडीएमके, तेलुगू देसम, माकप, मुस्लिम लीग, आरएसपी, केरळ काँग्रेस एम,, पीएमके, पीडीपी)- एकूण ८ ते ९ , राष्ट्रवादी काँग्रेस ४, सीपीएम- ५, द्रमुक- ७, अकाली दल- ३, शिवसेना -३. 
    भूमिका अस्पष्ट असणारे : आसाम गण परिषद- १, बसप- ४, 
बीजू जनता दल- ९, तेलगणा राष्ट्र समिती- ७ (३ अनुपस्थित)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com