दिवाळीपूर्वी आणखी एक दिवाळी पॅकेज भेट

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार दिवाळीपूर्वी आणखी एक प्रोत्साहन ‘पॅकेज’ जाहीर करणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने क्रयशक्ती वाढविणारे,  त्यानिमित्ताने बाजारातील मागणी वाढविणारे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे हे ‘पॅकेज’ असेल असे अर्थमंत्रालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी आज सांगितले.

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार दिवाळीपूर्वी आणखी एक प्रोत्साहन ‘पॅकेज’ जाहीर करणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने क्रयशक्ती वाढविणारे,  त्यानिमित्ताने बाजारातील मागणी वाढविणारे आणि रोजगार निर्मितीला चालना देणारे हे ‘पॅकेज’ असेल असे अर्थमंत्रालयाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी आज सांगितले.

भारताला वैश्विक उत्पादन केंद्र बनविण्याच्या धोरणांतर्गत सरकारने आज दहा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहपर योजना जाहीर केली आहे. या योजनेशी संबंधितच नवे स्टिम्युलस पॅकेज असेल. दिवाळीपूर्वी हे पॅकेज जाहीर केले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट 
केले.  त्यामुळे लवकरच पॅकेजची औपचारिक घोषणा होऊ शकते. 

कोरोना संकटात लागू झालेल्या लॉकडाउनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यातच जीएसटी भरपाई अडकल्यामुळे राज्यांनीही आर्थिक अडचणीवरून केंद्राविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. साहजिकच परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने उत्पादन वृद्धी, आर्थिक क्षमता वाढवून उत्पादन खरेदीसाठी क्रयशक्ती वृद्धी आणि रोजगार वृद्धी या त्रिसूत्रीवर आधारीत प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीपूर्वी आणखी एक स्टिम्युलस पॅकेजचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. 

लॉकडाउनमुळे वंचित घटकांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी गरीब कल्याण पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मरगळलेल्या उद्योग क्षेत्राला सावरण्यासाठी कर्ज पुनर्रचनेचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तारणहमीची अट शिथिल करण्यात आली होती. 
अलिकडेच सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेला दिवाळी बोनस अशाच पॅकेजचा हिस्सा होता. यामुळे बाजारातील मागणी वाढण्यास मदत झाली 
आहे.

क्रयशक्ती वाढवण्यावर भर
लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या बाजारातील व्यवहारांना आताच्या सणासुदीच्या काळात काहीशी चालना मिळाली आहे. मात्र सण संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न निर्माण होऊ नये आणि बाजारातील या मागणीतील सातत्य टिकून राहावे, यावर भर देणारे नवे पॅकेज असेल. या पॅकेजमध्ये प्रामुख्याने क्रयशक्ती आणि बाजारातील विक्री वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या