Farmers Protest : सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

नवीन कृषी कायदे दीड वर्षांसाठी पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे.

नवीन कृषी कायदे दीड वर्षांसाठी पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. हे तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द केले पाहिजेत, असे निवेदन संयुक्त किसान मोर्चाने दिले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या संपूर्ण सर्वसाधारण सभेत सरकारने दिलेला प्रस्ताव आज फेटाळण्यात आला असून, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबद्दल एमएसपीवर आधारित कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय देशाच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केला आहे. 

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बुधवारी चर्चेची दहावी फेरी झाली होती. या बैठकीत सरकारकडून नवे कृषी कायदे पुढील दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात देण्यात आला होता. याशिवाय तीन कृषी कायद्यांसाठी आणि एमएसपी करिता समिती नेमून या समितीच्या शिफारशी स्वीकारण्याची हमी सरकारकडून देण्यात आली होती. यानंतर आज सरकारने दिलेला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. 

त्यानंतर, ट्रॅक्टर रॅलीबाबत शेतकरी व पोलिस यांच्यातील चर्चा देखील निष्फळ ठरली असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीतील रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याबाबत शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत, तर दिल्ली पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली आहे. तसेच पळवळ ते मानेसर येथे पोलिसांनी ट्रॅक्टर  रॅली काढण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यातील या बैठकीतून कोणताच निर्णय साध्य झाला नसल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील सर्वात व्यस्त आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर मोर्चाच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.  

संबंधित बातम्या