शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भावनिक साद

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनामध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली: देशात केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर देशभरातील शेतकरी अंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्रसरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनामध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांसदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

एकाद्या जरी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तरी ती दु:खद गोष्ट असल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यपाल मलिक झुंझनुं येथे आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकरी अंदोलन एवढ्या काळ चालणं हे कोणाच्याही फायद्याचं नसल्याचे  मलिक यांनी मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना, ''एखादं कुत्र मेलं तरी आपले नेते दु:ख झाल्याचा संदेश व्यक्त करतात. इथे तर 250 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी कोणी काही बोललं नाही. हे मला फार दु:ख देणारं आहे,'' असं भावनिक वक्तव्य मलिक यांनी केलं.

भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाबाबत रेल्वे मंत्र्यांचं मोठं विधान

निकाली लागू शकत नाही असा कोणताही प्रश्न नसतो असं सागंतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये फारसं अंतर नाही. कृषी कायद्यावर चर्चा करुन तोडगा काढता येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यपालांनी किमान आधारभूत किंमत या एकमेव मुद्द्यावरुन वाद सुरु असल्याचं म्हटलं आहे. एमएसपीला कायदेशीर मान्यता दिली तर हा प्रश्न सहजरित्या सुटू शकतो असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. ''आता देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आंदोलनाचा मुद्दा पोहचला असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार पदावर असल्यामुळे मी शेतकऱ्यांना आणि नेत्यांना केवळ सल्ला देऊ शकतो,’’ असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.

यापूर्वी रविवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांची बाजू घेताना, ज्या देशातील शेतकरी आणि जवान समाधानी नसेल तर तो देश कधीही प्रगती करु शकत नाही असं म्हटलं होतं. 

संबंधित बातम्या