‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा रद्द झाल्यास लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

या परीक्षा घेण्याबाबत बहुतांश विद्यार्थीच आग्रही आहेत असा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला. लाखो विद्यार्थ्यांनी काही तासांतच हॉल तिकिटे डाऊनलोड केली त्यातून त्यांचे परीक्षेला समर्थन असल्याचे दिसते. 

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या काळामध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) आणि सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) घ्यायच्या की नाही? यावरून राज्ये विरुद्ध केंद्र असा संघर्ष पेटला असताना केंद्र सरकारच्या हट्टाच्या बाजूने आता शेकडो शिक्षणतज्ज्ञांची फौज सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. देश-परदेशातील १५० कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्यात आले असून त्यात, या परीक्षा रद्द केल्यास लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर केलेली गंभीर तडजोड ठरेल, असे म्हटले.

दरम्यान, या परीक्षा घेण्याबाबत बहुतांश विद्यार्थीच आग्रही आहेत असा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला. लाखो विद्यार्थ्यांनी काही तासांतच हॉल तिकिटे डाऊनलोड केली त्यातून त्यांचे परीक्षेला समर्थन असल्याचे दिसते. 

मोदी यांना पाठविलेल्या या पत्रावर लंडन, कॅलिफोर्निया, हिब्रू, बेन गुरियन, दिल्ली, अलिगड, बनारस हिंदू, जेएनयू आदी विद्यापीठांचे कुलगुरूंच्या सह्या आहेत.

आयआयटीकडून परीक्षांना पाठिंबा
नीट आणि जेईईच्या परीक्षा घेण्यास विलंब लावल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाईल तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षणाच्या दर्जावर देखील त्याचे विपरीत परिणाम होऊन याचे व्यापक दुष्परिणाम पाहायला मिळतील अशी भीती आयआयटीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.  विद्यार्थ्यांनी या परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर विश्‍वास ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे याआधीच शिक्षणाचे वेळापत्रक बिघडले असून हा विषाणू लवकर जाईल असेही वाटत नाही. शैक्षणिक वर्षच शून्य झाले तर याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल, असे आयआयटी रूरकीचे संचालक अजित चतुर्वेदी यांनी सांगितले. आयआयटी खरगपूर, रोपड, गांधीनगर आणि गुवाहाटी यांनी परीक्षा घेण्यास पाठिंबा दिला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या