सरकारने झोपा काढल्या

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

राहुल गांधी यांचे सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली

चीनला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय सहमतीच्या हेतूने सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीआधीच काँग्रेसने सरहद्दीवरील हिंसक घटनाक्रमांनंतर मोदी सरकारवर प्रहार केला. चीन सुनियोजित हल्ला करत असताना सरकार झोपा काढत राहिले आणि सैनिकांना त्याची किंमत चुकवावी लागली, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी खरमरीत शब्दांत ट्विट करून सरकारवर टीकास्त्र
सोडले. ‘आता स्पष्ट झाले आहे, की गलवानमध्ये झालेला चिनी हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता; परंतु सरकार झोपा काढत राहिले आणि समस्या नाकारत राहिले. याची किंमत आपल्या हुतात्मा झालेल्या जवानांनी चुकवली’, असे आक्रमक ट्विट केले; तसेच सरकारमधील मंत्री पंतप्रधान मोदींना वाचविण्यासाठी ओळीने खोटे बोलत असल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला. या खोटेपणातून हुतात्म्यांचा अपमान केला जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.
चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर लक्ष्य करणे चालविले आहे. गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान हुतात्मा होण्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल काल राहुल यांनी केला होता; तसेच सरहद्दीवर नेमके काय झाले, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का आहेत, अशीही खोचक विचारणा राहुल यांनी केली होती.

संबंधित बातम्या