ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी संकलन थोडे कमीच

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्‍या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्‍या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील महिन्यात सरकारला ‘जीएसटी’मधून १.०४ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी संकलन थोडे कमी होते. 

ऑक्टोबर २०२० मध्ये जीएसटी संकलन १.०५ लाख कोटी रुपये होते. त्याचबरोबर, मागील वर्षाच्या नोव्हेंबरच्या तुलनेत हे संकलन १.४ टक्के जास्त आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारला ‘जीएसटी’मधून १,०३,४९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘जीएसटी’च्या महसुलातील ही वाढ मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी जास्त होती. मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीमध्ये ४.९ टक्के वाढ झाली होती. त्याचबरोबर देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी जास्त होता.

असा आला एकूण ‘जीएसटी’
नोव्हेंबर २०२० मध्ये ‘जीएसटी’चा एकूण महसूल १,०४,९६३ कोटी रुपये आहे. त्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) १९,१८९ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २५,५४० कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) ५१,९९२ कोटी रुपये आहे. (त्यातील २२,०७८ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर मिळालेले आहेत). 
यामधील उपकरामधून ८,२४२ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर मिळालेल्या ८०९ कोटी रुपयांचा समावेश आहे) आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्‍हटले आहे.

संबंधित बातम्या