सीमेलगतच्या गावात ड्रोन पडल्याने खळबळ

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

या ड्रोनला मिरासाहिब येथून नियंत्रित केले जात होते. हा ड्रोन नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने अपघातग्रस्त झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.

जम्मू

जम्मूलगत भुथाईचक गावात एक ड्रोन अचानक पडल्याने नागरिकांत खळबळ उडाली. जम्मू भागाची रेकी करण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोन पाठवला की काय, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली होती. अखेरीस हा ड्रोन लष्कराचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.
सतवारी पोलिस ठाण्यातंर्गत सीमेलगतचे भुथाईचक गावात सकाळी अचानक रस्त्यावर ड्रोन पडल्याचे काही नागरिकांनी पाहिले. ड्रोन लहान असला तरी त्यात कॅमेरा होता. या प्रकाराची माहिती कळताच ड्रोन पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली. भुथाईचक गाव आंतराष्ट्रीय सीमेलगत असल्याने पाकिस्तानने ड्रोन पाठवला की काय? अशी शंका वर्तविली गेली. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. या ड्रोनची माहिती पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर तो ड्रोन ताब्यात घेतला. तपासाअंती हा ड्रोन पाकिस्तानचा नसून लष्कराचाच असल्याचे उघड झाले. ड्रोनच्या मदतीने लष्कर दररोज परिसरातील सुरक्षेचा आढावा घेते. या ड्रोनला मिरासाहिब येथून नियंत्रित केले जात होते. हा ड्रोन नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने अपघातग्रस्त झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेऊन नंतर तो लष्कराच्या हवाली केला.

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या