लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला धावलं निवडणूक आयोग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

कोरोना विषाणू विरुद्धची लढाई उद्यापासून आणखी तीव्र होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे लसीकरणाच्या मोहिमेचे उदघाटन करणार आहेत. पंत्रप्रधान कार्यालयाने आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या देशातील लसीकरणाची मोहीम उद्यापासून पंतप्रधानांच्या उदघाटनानंतर सुरु होणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोना विषाणू विरुद्धची लढाई उद्यापासून आणखी तीव्र होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे लसीकरणाच्या मोहिमेचे उदघाटन करणार आहेत. पंत्रप्रधान कार्यालयाने आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूच्या देशातील लसीकरणाची मोहीम उद्यापासून पंतप्रधानांच्या उदघाटनानंतर सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाला संपवण्यासाठीची ही अंतिम लढाई म्हणजे जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.     

Khashaba Jadhav Birth Anniversary: 'ऑलिम्पिक'साठी ठेवलं होतं घर गहाण!

शनिवार पासून सुरु होत असलेली ही लसीकरणाची मोहीम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. पंत्रप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार कोरोना विरुद्ध तयार करण्यात आलेल्या लसी सर्व लस केंद्रांवर पोचविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, लसीकरणाच्या या मोहिमेत निवडणूक आयोगाने देखील मदतीचा हात पुढे केल्याची माहिती मिळाली आहे. बूथ स्तरावरील लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोग स्वास्थ्य विभागाला मदद करणार आहे. 

मागील वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र लिहून बूथ स्तरावरील 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींची ओळख पटवून देण्यासाठी मदतीची विनंती केली होती. आणि त्यानुसार निवडणूक आयोग लसीकरणाच्या या मोहिमेत सहभागी होणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणारी माहिती ही फक्त लसीकरणाच्या मोहिमेसाठीच वापरण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहसचिवांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. व त्यानुसार लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नोडल अधिकारी संपर्कात राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना शोधण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यादीची मदत घेण्यात येणार असल्याचे समजते. 

कोरोनाची लस सगळ्यात अगोदर एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या दोन कोटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यानंतर, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना ही लस देण्यात येणार आहे. व यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाच्या लढाईत सहभागी असलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या लसीचा खर्च सरकार उचलणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार उद्यापासून लसीकरणाची पहिली मोहीम देशभरातील 3006 लस केंद्रांवर सुरु होईल. ज्यात एका केंद्रावर एका सत्रात 100 जणांना लस देण्यात येणार आहे.         

संबंधित बातम्या