आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली सामूहिक संक्रमणाची कबुली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

डॉ. हर्षवर्धन यांनी प्रथमच आज वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, साऱ्या देशात सामूहिक संक्रमण सुरू झालेले नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

नवी दिल्ली- भारतात कोरोनाचा सामूहिक संसर्ग किंवा संक्रमण (कम्युनिटी ट्रांसमिशन) सुरू झाल्याचे केंद्र सरकारने अखेर कबूल केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना पश्चिम बंगाल तसेच काही राज्यांमधून त्याबाबतच्या सूचना मिळाल्या आहेत, असे सांगितले.

जूनपासून देशात कोरोना संक्रमितांची संख्या हजाराच्या पटात वेगाने वाढू लागली. दहा राज्यांमध्ये संक्रमित तसेच मृतांची सर्वाधिक संख्या आहे. देशात सामूहिक संक्रमण सुरू झाल्याचा केंद्राने वारंवार इन्कार केला होता.  डॉ. हर्षवर्धन यांनी प्रथमच आज वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, साऱ्या देशात सामूहिक संक्रमण सुरू झालेले नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

काही महिन्यांपूर्वी कोरोना यशस्वीरीत्या आटोक्यात आणणाऱ्या केरळमध्ये रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढू लागल्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ओणम सणाच्या काळात सामाजिक अंतर पाळण्याकडे झालेले दुर्लक्ष केरळला भोवले. आहे. आगामी सणासुदीच्या काळात इतर राज्यांनाही केरळमुळे मिळालेला हा धडा ठरवू शकतो. केरळमधील रुग्णसंख्या अचानक वाढत जाऊन साडेतीन लाखांवर आणि मृतांची संख्या ११३९ वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी राज्यातील काही भागात संक्रमण सुरू झाल्याचे म्हटले होते. हे मान्य करून हर्षवर्धन म्हणाले की, घनदाट वस्ती असलेल्या भागांमध्ये असे संक्रमण झालेले असू शकते. मात्र संपूर्ण देशात अशी परिस्थिती नाही.
 

संबंधित बातम्या