पुढील सहा महिन्यात बेळगाव महापालिका निवडणूक होणार हे नक्की!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

हुबळी-धारवाडसह राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश गुरुवारी  उच्च न्यायालयाने दिला.

बेळगाव: हुबळी-धारवाडसह राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश गुरुवारी (ता. १७) उच्च न्यायालयाने दिला. हुबळी-धारवाड येथील के. गुरुनाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना गुरुवारी न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती विश्‍वजित शेट्टी यांच्या विभागीय पीठाने हा निर्णय दिला. यावेळी नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रियाही तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला बजावण्यात आला आहे.

या आदेशामुळे प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्यानंतर पुढील तीन महिन्यांत निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका हुबळी-धारवाड महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेशी संबंधित असली तरी न्यायालयाने निर्णय देताना राज्यातील सर्वच नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

११ डिसेंबर रोजी विजापूर महापालिका निवडणुकीसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीही न्यायमूर्ती ओक व न्यायमूर्ती शेट्टी यांच्या विभागीय पीठासमोर झाली होती. त्यावेळीही पाच महिन्यांत राज्यातील सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश विभागीय पीठाने बजावला होता. आता १७ रोजी राज्यशासन व निवडणूक आयोगाला न्यायालयाने प्रभाग पुनर्रचना व आरक्षण तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेची प्रभाग पुनर्रचना व आरक्षण नव्याने होणार हे आता नक्की झाले आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने शहरातील प्रभाग हद्द निश्‍चितीचे काम सुरू केले आहे. हे काम जनगणनेसाठी सुरू असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले असले तरी निवडणुकीसाठीच प्रभाग हद्द निश्‍चिती सुरू असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात होते. गुरूवारीही यासंदर्भात महापालिकेत बैठक झाली. यावेळी प्रभागनिहाय नकाशांची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांकडून घेतली.

बेळगावचाही मार्ग मोकळा
प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाची नवी अधिसूचना काढण्याची लेखी हमी कर्नाटक शासनाने २६ सप्टेंबर २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दिली आहे. पण एक वर्ष झाले तरी अधिसूचना काढलेली नाही. लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण होऊन दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही बेळगाव महापालिकेची निवडणूक झालेली नाही. आता विजापूर व हुबळी-धारवाड महापालिका निवडणुकीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शासनाला पुढील तीन महिन्यांत पुनर्रचना व आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात बेळगाव महापालिका निवडणूक होणार हे आता नक्की झाले आहे.

आणखी वाचा:

ममता बॅनर्जींचं पुन्हा केंद्र सरकारविरूद्ध बंड -

संबंधित बातम्या