इस्लामिक प्रवेश परीक्षेत हिंदू विद्यार्थ्याने मारली बाजी; असा विक्रम करणारा देशातील पहिलाच हिंदू विद्यार्थी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

शुभम यादव या विद्यार्थ्याने इस्लामिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेत केंद्रीय विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जयपूर-  जयपूर येथील शुभम यादव या विद्यार्थ्याने इस्लामिक अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेत केंद्रीय विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश मिळवणारा तो देशातील पहिलाच बिगरमुस्लिम तसेच बिगरकाश्‍मिरी विद्यार्थी ठरला आहे.

सध्या नागरिकांमध्ये धार्मिक भेद मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यात इस्लाम धर्माबाबत सर्वाधिक गैरसमज आहेत. अनेक जागतिक नेते या धर्माबाबत व्यक्त होत आहेत. त्यामुळे हा धर्म पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणि दोन धर्मांमध्ये संवादाचा पूल बांधला जाण्याच्या हेतूने मी या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरवले, असे शुभमने सांगितले.

शुभमने दिल्ली विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पदवी मिळवलेली आहे. देशात केवळ काश्‍मीरमधील केंद्रीय विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणात इस्लामिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे शुभम आपले पुढील शिक्षण काश्‍मीरमध्ये विद्यापीठात पूर्ण करणार आहे.

मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे

जगद्‌गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठाचे प्रमुख शास्त्री कोसालेंद्र दास यांनी दोन धर्मांत संवाद निर्माण होण्यासाठी शुभम यादवचे यश नक्कीच आशादायी असल्याचे सांगितले आहे. तसेच, आपल्या विद्यापीठातही अनेक मुस्लिम विद्यार्थी संस्कृतचे धडे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इतर धर्मांबाबत गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या