कुडचडेत वीज बिलांची होळी

Dainik gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

कुडचडे काँग्रेस नेते हर्षद गावस देसाई म्हणाले की, सामान्य जनतेला दर महिना दोन हजार रुपये बिल परवडणारे नाही. गेले चार महिने सामान्य जनता घरात आहे. मिळकत बंद झाली आहे. भाजप सरकारने खाण बंदी, इतर व्यवसाय बंद आता संजीवनी कारखाना बंद करू पाहत आहेत, मग सरकार जनतेला सावरणार तरी कसे सर्व आघाडीवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

कुडचडेत वीज बिलांची होळी

काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक

कुडचडे,   : वीज बिलात वाढ करून ग्राहकांना नाहक मनस्ताप देणाऱ्या वीज खात्याच्या कुडचडे कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाच्या कुडचडे, सावर्डे आणि सांगेतील कार्यकर्त्यांनी मोर्चा आणून वीज कार्यालयाच्या दारात वाढलेल्या वीज बिलांची होळी केली. यावेळी काँग्रेसचे संकल्प आमोणकर, ट्रिबेलो सौझ, हर्षद गावस देसाई, अली शेख, श्याम भंडारी, अभिजित देसाई उपस्थित होते.
वीज खात्याचे कार्यकारी अभियंता विनायक म्हाळशेकर, साहाय्यक अभियंता अनिल गावकर, गुणा गावडे यांच्याशी शिष्टमंडळाने वाढीव वीज बिलासंदर्भात बातचीत केली असता टाळेबंदी कालावधीत मीटर रीडर आणि ग्राहक घरात असल्याने बिलाची रक्कम वाढली आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज दरात वाढ न करता वीज बिलात केलेली वाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नसल्याने ती त्वरित रद्द करण्याची मागणी केली असता हा विषय आपण आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालण्यात असल्याचे आश्वासन काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी काँग्रेस पुढारी संकल्प आमोणकर म्हणाले की, टाळेबंदी काळात जनतेला सरकारने घरात बसविले वीज बिले वेळेवर दिली नाहीत. ही वीज खात्याची चूक ती जनतेच्या माथी मारू नका. जनता भरडली जात असताना वीज बिले वाढून दिल्यास ती सामान्य जनतेला भरणे शक्य नाही, म्हणून सरकारने वीज बिले जनतेला माफ करण्यासाठी आमचा मोर्चा असून सरकार ती माफ न केल्यास विद्युत भवनावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
कुडचडे काँग्रेस नेते हर्षद गावस देसाई म्हणाले की, सामान्य जनतेला दर महिना दोन हजार रुपये बिल परवडणारे नाही. गेले चार महिने सामान्य जनता घरात आहे. मिळकत बंद झाली आहे. भाजप सरकारने खाण बंदी, इतर व्यवसाय बंद आता संजीवनी कारखाना बंद करू पाहत आहेत, मग सरकार जनतेला सावरणार तरी कसे सर्व आघाडीवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.
अभिजित देसाई म्हणाले की, वीज दर वाढ न करता वीज बिले वाढवून जनतेची लुबाडणूक सुरू आहे. एका बाजूने महामारी आणि दुसऱ्या बाजूने वीज बिलाची झळ जनतेला होरपळून टाकीत आहे.
श्याम भंडारी म्हणाले सावर्डे मतदारसंघातील जनता खाण व्यवसायावर अवलंबून होती पण तोच व्यवसाय सुरू करणे सरकारला शक्य होत नसल्याने वाढत्या बेकारीत वीज बिलात वाढ म्हणजे जनतेची लूट असल्याचे सांगितले. यावेळी ट्रिबेलो सौझ यांनी बिलाची रक्कम वाढ केलेल्याची चौकशी करण्याची मागणी करून भाजप सरकारचा निषेध केला.
यावेळी कुडचडे काँग्रेसचे अध्यक्ष अली शेख, उबेद खान, प्रकाश भगत, इरफान किल्लेदार, चंदा वेळीप,ॲड. विराज नागेकर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कुडचडे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई आपला फौज फाटा घेऊन उपस्थित होते.

संबंधित बातम्या