अयोध्येत धार्मिक विधी सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

उद्या भूमिपूजन सोहळा; बंदोबस्त वाढवला अन पताकांनी नगर सजले

अयोध्या

अयोध्येत बुधवारी (ता. ५) दुपारी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. तत्पूर्वी सोमवारपासून अयोध्येत गणेश पूजनाने धार्मिक विधी आजपासून सुरू झाले. संत संपर्क प्रमुख आणि विहिंपचे सरचिटणीस अशोक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमिपूजनाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून त्यानुसार गणेशपूजन करण्यात आले. ही पूजा सुमारे अडीच ते तीन तास चालली. गणेशपूजनानंतर ४ ऑगस्ट रोजी राम पूजन होणार आहे.
राम मंदिराच्या भूमिपूजनाअगोदर कार्यक्रमाच्या ठिकाणी पूजन सुरू झाले. चार ऑगस्ट रोजी जप केला जाईल तर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य पूजा होणार आहे. शहरातील सर्व मंदिरात अखंड रामायणाचे पाठ होणार आहेत. पूर्णाहुती चार ऑगस्टला होईल. बुधवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम दुपारी ११ ते १२ या काळात होईल. यासाठी काशी, अयोध्या, दिल्ली आणि प्रयागराज येथील विद्वानांना बोलवण्यात आले आहे. ही मंडळी वेगवेगळ्या पूजेत कुशल आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात २१ ब्राह्मणांची टिम असून ते वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करणार आहेत. एकाचवेळी नाही तर वेगवेगळ्या कालखंडात पूजा होणार आहे. कोणत्याही वैदिक विधीला वेळ लागतो. त्यामुळे ३ ऑगस्टपासूनच प्रक्रिया सुरू केल्याचे, अशोक तिवारी म्हणाले. रामजन्मभूमि कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या पताकांनी संपूर्ण शहर नटले आहे. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता साकेत महाविद्यालयापासून ते हनुमानगढीपर्यंतच्या रस्त्यापर्यंत डबल बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर भूमिपूजन कार्यक्रमात सोशल डिस्टिन्सिंगचे पालन व्हावे यासाठी दोनशे ते अडीचशे लोकांना बसण्यासाठी मंडपाचा आकार मोठा करण्यात आला आहे. वेगवेगळे व्यासपीठ तयार केले जात आहे. सध्या मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महंत नृत्यगोपालदास असणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या येथे सुरक्षेचा आणि कार्यक्रमाचा आढावा घेतला.

लखनौच्या १११ चौकात श्रीरामाचे फलक झळकणार
अयोध्येत तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केलेले असताना लखनौमध्ये देखील उत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरातील १११ चौकात भगवान श्रीरामाचे चित्र आणि ध्वज फडकावण्यात येणार आहे. चौकाच्या रंगरंगोटीचे आणि सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. पाच ऑगस्टला सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष नाराज
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र कुमार द्विवेदी उद्या (ता. ४) अयोध्येला दाखल होणार आहेत. ते आपल्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसमवेत येत आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने द्विवेदी नाराज आहेत. ५ ऑगस्टला त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, योग गुरु रामदेव बाबा उद्या दुपारी अयोध्येत पोचणार आहेत. हनुमानगढी येथील महंत कल्याण दास यांच्या निवासस्थानी ते थांबणार आहेत. ते भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

भूमिपूजनाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध
राम मंदिर भूमिपूजनाची निमंत्रण पत्रिका प्रथमच माध्यमांसमोर आली आहे. या पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव शीर्षस्थानी ठेवले आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र विश्‍वस्तांचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या वतीने निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. या पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा विशेष पाहुणे म्हणून उल्लेख केला आहे. त्यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नावे आहेत. निमंत्रण पत्रिकेनुसार भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

मशिदीसाठीही पाच एकर जमीन
राम मंदिराच्या उभारणीची युद्धपातळीवर तयारी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बाबरी मशिदीच्या उभारणीसाठी देखील पाच एकरची जमीन शनिवारीच सुन्नी वक्फ बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हा न्यायदंडाधिकारी अनुजकुमार झा यांच्या हस्ते ही जमीन बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अयोध्येत मशिदीच्या उभारणीसाठी सुन्नी बोर्डाकडून इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

 

रामलल्लाची पोशाख निर्मिती
तीन दशकांपासून एकाच कुटुंबाकडे

गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून अयोध्येतील रामलल्लांसाठी पोशाख शिवणारे बंधू शंकरलाल आणि भगवतलाल यांनी भूमिपूजनासाठी सोनेरी धाग्याचा आणि रत्नांचा वापर करुन मखमलपासून विशेष पोशाख तयार केला आहे. नउ रत्नाने सजवलेला मखमलचा पोशाख येत्या ५ ऑगस्ट रोजी रामलल्लाला घालण्यात येणार आहे.
गेल्या तीन पिढ्यांपासून रामलल्लांचा पोशाख शिवण्याचे काम बडी कुटिया भागात राहणारे शंकरलाल (वय ५४) यांचे कुटुंब करत आहेत. ऐतिहासिक क्षणी रामलल्ला यांना आम्ही शिवलेला पोशाख घालण्याचा मान मिळत आहे आणि ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे, असे शंकरलाल म्हणाले. दोन सेटमध्ये पोशाख असून एक हिरव्या रंगाचा तर दुसरा भगव्या रंगाचा आहे. गुरुवारी पिवळ्या रंगाचा, शुक्रवारी क्रिम रंगाचा आणि शनिवारी निळ्या रंगाचा पोशाख घालण्यात येणार आहे. शंकरलाल यांचा पुतण्या पवन कुमार, संजय कुमार आणि श्रावण कुमार पोशाखासाठी सहकार्य करत आहे. त्यांचा मुलगा राजवीर हा सातवीत असून तो देखील या कामात मदत करत असल्याचे शंकरलाल म्हणाले. शंकरलाल यांचे मोठे बंधू भगवतलाल हे अगोदर पोशाख तयार करण्याचे काम करत होते. शंकरलाल आणि भगवतलाल यांचे वडिल बाबूलाल हे रामलल्लांसाठी १९८५ पासून पोशाख शिवण्याचे काम करत होते. हे काम रामजन्मभूमिचे पूजारी लालदास यांनी सोपवले होते. पूर्वी बाबूलाल, भागवतलाल, शंकरलाल हे कपडे शिवण्याचे काम करत होते. बाबूलाल यांचे निधन झाल्यानंतर ही जबाबदारी मुलांवर आली.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या