कोरोनाच्या खबरदारीसाठीचे उर्वरित नियम शिथिल; हॉटेल, स्विमिंग पूल व चित्रपट गृहे पूर्ण खुली   

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

सुरवातीला जगभरात सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावावर कोणताच इलाज नसल्याच्या कारणामुळे टाळेबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर या टाळेबंदीचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ लागल्याने हळू-हळू ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती.

सुरवातीला जगभरात सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावावर कोणताच इलाज नसल्याच्या कारणामुळे टाळेबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. मात्र त्यानंतर या टाळेबंदीचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ लागल्याने हळू-हळू ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. टप्याटप्याने टाळेबंदीचे नियम कमी करून कोरोनाची खबरदारी घेत दैनंदिन व्यवहाराला सुरवात झाली. जगभरासह देशात देखील कोरोनाला रोखण्यासाठी याच प्रकारच्या नियमांना लागू करण्यात आले होते. परंतु आता देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात झाली असून, उर्वरित निर्बंध देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशात कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून सुरवातीला गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर यानंतर टाळेबंदीत शिथिलता देताना काही शर्तींसह सर्व दैनंदिन व्यवहारास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे बऱ्यापैकी जनजीवन पुन्हा रुळावर परतू लागले. यामध्ये खासकरून हॉटेल, स्विमिंग पूल आणि चित्रपट गृहांना सशर्त परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने यात आणखी सूट देत सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे वापरण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज याबाबतचे दिशानिर्देश जारी केले असून, फेब्रुवारी महिन्यासाठी म्हणून कोरोनाबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे.   

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील महिन्यासाठीच्या नियमावलीचे निर्देश देताना, कॅन्टोमेंट झोन बाहेर सर्व प्रकारच्या दैनंदिन व्यवहारांना परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त प्रवासावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले असून, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व उपक्रमांना राज्यांच्या नियमांप्रमाणे परवानगी देण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेले निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले.       

संबंधित बातम्या