कोरोना संकटकाळातील कामगिरीमुळे पोलिसांची प्रतिमा बदलली: पंतप्रधान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीतील २०१८ च्या बॅचच्या आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे आज दिक्षान्त संचलन झाले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

नवी दिल्ली: खाकी वर्दीचा सन्मान राखण्यासाठी आपण सदैव सज्ज राहू, अशी भावना कायम मनात बाळगायला हवी. तिरंगा ध्वजाएवढाच मान-सन्मान पोलिसांच्या खाकी गणवेशालाही द्यायला हवा. कोरोनाकाळातील स्पृहणीय कार्य पाहून लोकांचा खाकी वर्दीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. 

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीतील २०१८ च्या बॅचच्या आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे आज दिक्षान्त संचलन झाले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, आजघडीला आपण पोलिस कर्मचाऱ्यांना विविध भूमिकेत पाहत आहोत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पोलिस म्हणजे करड्या शिस्तीचा, दंड ठोठावणारा, दंडुके घेऊन मागे लागणारा, अशी प्रतिमा होती. परंतु कोरोनासारख्या संकट काळात पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीने मोठे काम केले आहे. नागरिकांनीही त्यांना प्रोत्साहित आणि कौतुक केले आहे. अडचणीत आलेल्यांची सेवा केली आहे.

किरण श्रुती सर्वोत्तम
अकादमीचे संचालक अतुल करवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ महिलांसह १३१ आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकारी दिक्षांत संचलनात सहभागी झाले होते. या वेळी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून डी.व्ही. किरण श्रुती यांची निवड झाली. या निवडीबद्धल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांना तमिळनाडू केडर मिळाले आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करत देशसेवा करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या