मुख्यमंत्री भूपिंदर सिंहांसह त्यांच्या वडिलांनाही निवडणुकीत हरविले होते; आता १००व्या वर्षी कोरोनालाही हरवले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

हरिचंद हुड्डा यांना वयाच्या शंभराव्या वर्षीही साखरेशी संबंधित किंवा रक्तदाबाशी संबंधित आजारांनी अजून गाठले नाही.  

रोहतक-  माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंह हुड्डाच नाही तर त्यांच्या वडिलांनाही निवडणुकीत पराभूत केलेल्या शंभर वर्षीय हरिचंद हुड्डा यांनी कोरोनालाही पराभूत केले आहे.  कोरोनाबाधित झाल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी त्यांचा शेवटची कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने आणि त्यांची प्रकृतीही ठणठणीत असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे हरिचंद हुड्डा यांना वयाच्या शंभराव्या वर्षीही साखरेशी संबंधित किंवा रक्तदाबाशी संबंधित आजारांनी अजून गाठले नाही.  

 हरिचंद यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांचा मुलगा रामनिवास हुड्डा याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. रामनिवास यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'सर्वांत आधी मला कोरोनाची लागण झाली होती. माझ्या संपर्कात आल्याने वडिलांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांना रोहतक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.'

१६ नोव्हेंबर रोजी हरिचंद यांची शेवटची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते कोरोना निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांचे पुत्र रामनिवास यांना अद्याप घरी सोडण्यात आले नसून त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्याशिवाय त्यांना घरी सोडता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

 २१ ऑक्टोबर रोजी हरिचंद यांचा रोहतकच्या चमरिया गावात जन्म झाला होता. त्यांनी शिक्षणासाठी दिल्ली गाठले. तेथे त्यांनी पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण संपादित करून सैन्यात काम करायला सुरूवात केली. मात्र, त्यानंतर काह काळाने ते राजकारणात सक्रिय झाले. भारतात १९७५ला लागलेल्या आणीबाणी दरम्यान त्यांना तुरूंगातही जावे लागले. १७७७ मध्ये त्यांना जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली. रोहतकमधील गढी सांपळा किलोई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भूपेंदर सिंह हुड्डा यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी रणबीर सिंह हुड्डा यांच्याविरोधात निवडणूक लढवली. हरिचंद यांनी रणबीर यांना धक्का देत त्यांचा पराभव केला.

त्यानंतर १९८२ मध्ये रणबीर सिंहाच्या जागी त्यांचे पुत्र भूपेंदर सिंह हुड्डा यांना उमेदवारी देण्यात आली. लोकदलच्या तिकिटावर लढणाऱ्या हरिचंद यांनी भूपिंदर यांनाही पराभूत केले. त्यानंतर मात्र काही वर्षांनी भूपिंदर सिंह हरियाणाचे मुख्यमंत्री झाले होते.    

  

संबंधित बातम्या