‘मला माझ्या मित्राची खूप आठवण येते,’  मोदींकडून जेटलींना आदरांजली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘मला माझ्या मित्राची खूप आठवण येते,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही जेटलींबरोबरच्या मैत्रीला उजाळा दिला. 

नवी दिल्ली: राज्यसभेचे माजी सभागृहनेते व देशाचे माजी अर्थ, पर्यावरण, संरक्षण व माहिती-प्रसारणमंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरूण जेटली यांना त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आज देशभरात आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘मला माझ्या मित्राची खूप आठवण येते,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही जेटलींबरोबरच्या मैत्रीला उजाळा दिला. 

जेटली यांच्या स्मृतीनिमित्त भाजपच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात आले. २०१४ मधील लोकसभा निवडणूकीत पराभूत होऊनही मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ व संरक्षण यासारखी अत्यंत महत्वाची पदे सांभाळणारे जेटली यांची प्रकृती २०१८ येता येता तोळामासा झाली होती. पंतप्रधानांनी म्हटले आहे की,‘मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही आमच्या अरूण जेटली यांना गमावले होते. मला माझ्या या मित्राची फार आठवण येते. त्यांचा हजरजबाबीपणा, संसदीय वक्तृत्व, बुद्धिमत्ता, कायद्याचे सखोल ज्ञान व शानदार व्यक्तिमत्वाचे अनेक भोक्ते होते.’ जवाहरलाल नेहरू क्रीडागारात झालेल्या जेटली यांच्या शोकसभेतील भाषणाचा अंशही मोदी यांनी ट्‌विटरवर उपलब्ध करून दिला आहे. 

 

 

नायडू यांनी जेटली यांच्या बालपणातील (१९५७ चा) एक दुर्मिळ फोटो ट्‌विटवर उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी दोघांच्याही खाद्यप्रेमाच्या आठवणी जागविताना म्हटले की, पक्षाच्या कामासाठी आम्ही दोघे जिथे जात असू तिथे त्या शहरातील उत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंट व हॉटेलची माहिती अवश्‍य घेत असू. संसदीय मर्यादांबाबत त्यांना जी श्रद्धा होती त्यामुळे ते महान संसदपटू बनले.

अरूण जेटली. भारतीय राजकारणात ज्यांना तोड नाही असे एक कुशल राजकारणी, विपुल वक्ते व महान माणूस. - अमित शहा, गृहमंत्री 

पद्मभूषणने सन्मानित झालेल्या जेटली यांच्या जनकल्याणकारी योजनांतील अप्रतिम योगदानासाठी ते कायम स्मरणात राहतील. - जे. पी, नड्डा, भाजपाध्यक्ष

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या