नोएडा सीमेवरील आंदोलक शेतकरी नेत्यांना सरकार ने दिलेल्या लेखी प्रस्तावांची केली होळी

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

सरकारने शेतकऱ्यांची मागणी ऐकली नाही तर २६ जानेवारीनंतर दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून कृषीपथ करण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान युनियनने दिला आहे. 

नवी दिल्ली: कृषी सुधारणा कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा निर्धार चोविसाव्या दिवशीही कडाक्‍याच्या थंडीत कायम आहे. नोएडा सीमेवरील आंदोलकांनी केंद्राकडून शेतकरी नेत्यांना दिलेल्या लेखी प्रस्तावांची होळी करून निषेध केला. सरकारने शेतकऱ्यांची मागणी ऐकली नाही तर २६ जानेवारीनंतर दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून कृषीपथ करण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान युनियनने दिला आहे. 

हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकल्याने दिल्लीतील वाहतुकीवर सकाळी व संध्याकाळी मोठा परिणाम होत आहे. अनेक रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. दिल्लीबाहेर जाणारे रस्ते मात्र शेतकऱ्यांनी २४ तास पूर्णपणे रोखलेले नसल्याचा दावा शेतकरी नेते करत आहेत. शेतकऱ्यांनी आज दिल्ली-सहारनपूर महामार्ग काही काळ रोखून धरला होता, खाप पंचायतीने या आंदोलनाचे नेतृत्व केले. दिल्ली- मेरठ महामार्गही रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. फतेहाबाद येथे कृषी कायद्यांना पाठिंबा म्हणून उपवास आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते व शेतकरी यांच्यात जोरदार संघर्ष झाला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांचे अडथळे तोडले व भाजपचाही तंबू उखडून टाकून पोस्टर फाडली. 

सरकारकार आरोप
नोएडा सीमेवर आज आंदोलकांनी सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांचा मसुदा जाळून निषेध केला. कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा व आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोप या नेत्यांनी केला. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत व व्ही. एम. सिंह यांनी दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नये यासाठी मेरठच्या पोलिस आयुक्तांशी उद्या (ता.२०) चर्चा करण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

संबंधित बातम्या