चालकांनो सावधान! टोल भरताना फास्टॅग नसल्यास दाखल होणार गुन्हा

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 मार्च 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना, देशातील सर्व मॅन ऑपरेटिंग टोल बूथ एका वर्षाच्या आत हटवणार असल्याचे सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना, देशातील सर्व मॅन ऑपरेटिंग टोल बूथ एका वर्षाच्या आत हटवणार असल्याचे सांगितले. व जीपीएस इमेजिंग सिस्टिमच्या आधारे टोल वसूल करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. याशिवाय 15 वर्षानंतर खासगी वाहनांची नोंदणी काढली जाणार असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. केंद्र, राज्य, महानगरपालिका, पंचायत, एसटीयू, सार्वजनिक उपक्रम आणि संघटना व राज्यासह स्वायत्त संस्थाची सर्व वाहने 15 वर्षानंतर नोंदणीतून काढून टाकली जाणार असून, ही वाहने स्क्रॅप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात 20 वर्षाहून अधिक जुन्या वाहनांची संख्या 51 लाख असल्याचे आज लोकसभेत सांगितले. तर 15 वर्षापेक्षा जास्त जुन्या वाहनांची संख्या 34 लाख असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, वाहन फिटनेस प्रमाणपत्राशिवाय 15 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या वाहनांची संख्या 17 लाख असल्याचे नितीन गडकरी यांनी आज सांगितले. तसेच जुन्या वाहनांमुळे 10 ते 12 पट जास्त वायू प्रदूषण होते आणि अशी वाहने सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी आज पुढे दिली. 

Farmeres protest : शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्या; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची...

यानंतर, स्वैच्छिक वाहन आधुनिकीकरण कार्यक्रम सुरु करणार असल्याचे नमूद करत, यात जे जुन्या वाहनांना स्क्रॅप करतील व नवी वाहने घेतील अशांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. या धोरणामुळे स्क्रॅप सेंटर, वाहन उद्योग आणि संबंधित उद्योगांना फायदा होणार असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. याव्यतिरिक्त, देशातील 93 टक्के वाहने ही आता टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. परंतु  7 टक्के वाहनांना टोल भरताना दुप्पट रक्कम भरावी लागत असली तरी त्यांनी फास्टॅग लावलेले नसल्याचे ते म्हणाले. 

तसेच, ज्या वाहनांनी टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर करण्यास सुरवात केलेली नाही अशा वाहनांसाठी पोलिस चौकशीचे निर्देश देण्यात आले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. इतकेच नाही तर, वाहनांना फास्टॅग नसल्यास टोल चोरी व जीएसटी चोरीचा गुन्हा दाखल होणार असल्याचे ते म्हणाले. देशात 16 फेब्रुवारी 2021 पासून टोल भरताना वाहनांना फास्टॅग नसल्यास टोल प्लाझावर दुप्पट रक्कम भरावी लागत आहे. टोल प्लाझावर डिजिटल स्वरूपात टोल भरण्याची सुविधा लागू करण्यात आली आहे. आणि यामुळे इंधन आणि वेळेची बचत होत आहे.     

संबंधित बातम्या