कामगार हवे असल्यास आमची परवानगी लागणार : योगी आदित्यनाथ

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

स्थलांतरण आयोगाची उत्तर प्रदेशात स्थापना
 

लखनौ

 उत्तर प्रदेशातील कामगारांची अन्य राज्यांमध्ये आवश्यकता असल्यास उत्तर प्रदेश सरकारकडे तशी परवानगी घ्यावी लागणार असल्याचे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले. तसेच इतर राज्यांतून उ. प्रदेशात आलेल्या श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दुहेरी रणनीती आखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या विषयी बोलताना योगी म्हणाले, की बाहेरील राज्यांमधून उत्तर प्रदेशात आलेल्या कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याचवेळी हे मजूर त्या राज्यामध्ये काय काम करत होते याचीही माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी गोळा केली आहे. आता इथूनपुढे कोणत्याही राज्याला त्यांना नोकरी द्यायची असेल तर त्या राज्याने त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि आर्थिक अधिकारांची हमी देणे यापुढे बंधनकारक असणार असल्याचे योगींनी सांगितले.तसेच यासाठी उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांच्या रोजगारासाठी लवकरच 'स्थलांतरण आयोगा'ची स्थापना करणार असल्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली. या अंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्व कामगार आणि श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक सुरक्षेची हमी देखील दिली जाईल, असे आदित्यनाथ म्हणाले.

संबंधित बातम्या