आयआयटी खडगपूरच्या संशोधनातून वेदनाविरहित सूक्ष्म सुई विकसित

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

त्वचेमधून देण्यात येणाऱ्या औषधांसाठी या उपकरणाचा व्यापक वापर होऊ शकतो, असेही प्रा. भट्टाचार्य यांनी सांगितले. 

कोलकता: आयआयटी खडगपूरमधील संशोधकांनी सूक्ष्म सुई विकसित केली आहे. या सुईच्या मदतीने रुग्णांना वेदनारहित पद्धतीने औषध देणे शक्य होणार आहे. म्हणजेच मोठ्या औषधाचे कण या सुईच्या माध्यमातून सहजपणे रुग्णांच्या शरीरात सोडता येऊ शकतील. ही माहिती संस्थेने शनिवारी एका निवेदनाद्वारे  दिली.

सूक्ष्मपंपाचीही रचना
‘‘त्वचाविरोधी बलाचा सामना करू शकेल अशी उच्च शक्तीची पारदर्शक कार्बन सूक्ष्म सुई आम्ही तयार केली आहे. या सुईप्रमाणेच पॉलिमर मेटल आणि त्वचेच्या पटलावर आधारित सूक्ष्मपंपाची रचनाही तयार केली आहे. यातून औषधांच्या कणांचा प्रवाह नियंत्रितपणे व योग्य प्रमाणात वाढवता येतो. औषधाची मात्रा नियंत्रित पद्धतीने देण्यासाठी सूक्ष्म सुई व सूक्ष्म पंपाचे एकत्रीकरण आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्वचेमधून देण्यात येणाऱ्या औषधांसाठी या उपकरणाचा व्यापक वापर होऊ शकतो, असेही प्रा. भट्टाचार्य यांनी सांगितले. 

कोरोनाच्या लशीसाठी वापर
आयआयटी खडगपूरच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाने ही सूक्ष्म सुई विकसित केली आहे. या सुईच्या व्यासाचा आकार कमी करण्याबरोबरच त्याची क्षमताही वाढविली आहे. यामुळे सुई त्वचेवर टोचताना ती तुटण्याची भीती कमी होणार आहे. इन्सुलिन शरीरात सोडण्याबरोबरच भविष्यात या सूक्ष्म सुईचा वापर कोरोनाच्या लशीसाठी होऊ शकतो, अशी आशा निवेदनात व्यक्त केली आहे. या सुईचे मुख्य संशोधक प्रा. तरुण कांती भट्टाचार्य म्हणाले की, इन्सुलिन शरीरात सोडणे किंवा ज्या आजारांसाठी लसिका प्रणालीद्वारे औषधोपचार केले जातात, त्यासाठी ही सुई उपयोगी ठरणार आहेत. या आजारांमध्ये त्वचेसह कर्करोगाचे काही प्रकारांचा समावेश आहे. अगदी कोरोनाच्या लसीकरणातही सूक्ष्म सुईचा वापर करता येऊ शकेल.

प्रा. भट्टाचार्य म्हणाले...

  1. अनेक प्रकारच्या संशोधन व विकासातून अत्‍यंत प्रभावी ठरणाऱ्या सूक्ष्मसुईची निर्मिती. 
  2. सामान्य सुईतून शरीरात औषध सोडताना होणाऱ्या वेदनांपासून रुग्णाची मुक्तता होईल. 
  3. या सुईची चाचणी प्राण्यांवर केली असून त्याचे निष्कर्ष सकारात्मक आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या