‘आयआयटी मद्रास’मध्ये १०० जण कोरोना बाधित

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

आयआयटी मद्रासच्या वस्तीगृहात संसर्गाचा फैलाव झाल्याने संस्थेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विभाग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चेन्नई: आयआयटी मद्रासच्या वस्तीगृहात संसर्गाचा फैलाव झाल्याने संस्थेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि विभाग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयटी मद्रासला सध्या हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना इ-मेलद्वारे सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक जणांना लागण झाली असून त्यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. आजपर्यंत ४४४ जणांचे नमुने तपासले असून त्यापैकी १०४ विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या ९ वस्तीगृहात ७०० विद्यार्थी राहत असून ते संशोधक आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ७ डिसेंबरपासून वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने सर्व विभाग बंद करण्यात आले. कॅम्पसमध्ये प्रारंभी १ डिसेंबरला पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर १० डिसेंबर आणि आता १४ डिसेंबरला काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तीन दिवसात ५५ जणांना लागण झाली आहे.  कॅम्पसमध्ये ७७४ विद्यार्थी असून सर्वांची चाचणी केली जात आहे. त्यांना कॅम्पसबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वाधिक रुग्ण कृष्णा आणि जमुना वस्तीगृहात आढळून आले आहेत. विद्यार्थ्यांना सिलबंद डब्यातून जेवण दिले जात आहे. 

तमिळनाडूचा आकडा घसरला
चेन्नईचे आरोग्य अधिकारी संस्थेच्या संपर्कात असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, तमिळनाडू तसेच चेन्नईतील कोविडचा आकडा घसरला आहे. काल राज्यात नव्याने ११९५ रुग्ण आढळून आले. त्यात चेन्नईच्या ३४० जणांचा समावेश आहे. राज्यात बाधितांची संख्या ८ लाखांवर असली तरी सध्या केवळ १० हजार रुग्णांवरच उपचार सुरू  आहेत.

आणखी वाचा:

केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलकांची बदनामी: किसान मोर्चाचा गंभीर आरोप -

संबंधित बातम्या