ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ; मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

ममता बॅनर्जी यांनी पक्षातील ज्या नेत्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खूशाल निघून जावे असे सुणावल्यानंतर लगेच राज्यसरकामध्ये वनमंत्री असणारे रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे.

कोलकाता: आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या  निवडणुकांची तयारी सुरु असताना मात्र दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पक्षाला बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागत आहे. ममता बॅनर्जी यांनी पक्षातील ज्या नेत्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खूशाल निघून जावे असे सुणावल्यानंतर लगेच राज्यसरकामध्ये वनमंत्री असणारे रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे.मात्र राजीनामा देण्याचे कोणतेही कारण अद्याप कळू शकलेले नाही.रजीब बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे.ममतांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडणारे हे तिसरे मंत्री आहेत.

रजीब यांनी पत्रात लिहले की,'' मला 22 जानेवारी 2021 रोजी वनमंत्री पदाचा राजीनामा देताना खेद होत आहे. रजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते माझ्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून खोटा प्रचार करत आसल्याची तक्रार केल्यानंतर लगेच दुसऱ्या  दिवशी त्यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान रजीब बॅनर्जी हे पक्षाच्या विरोधात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सतत विधाने करत होते.पक्षातील जेष्ठ नेते पार्थ बॅनर्जी यांनी रजीब यांच्याशी संवाद साधला होता मात्र यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही.

'' पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांचं शोषण करत आसून त्यांचा माझ्या विरोधात खोटा प्रचार करण्यासाठी वापर केला जात असल्याचे रजीब यांनी यापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते.'' डिसेंबरच्या महिन्यात तृणमुल पक्षातील जेष्ठ नेते शुबेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. आणि त्यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर भाजपाचा हात धरला. भाजपात प्रवेश करताना त्यांच्याबरोबर पक्षातील अन्य नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला होता.

शुबेंदू यांच्यानंतर राज्याचे क्रीडामंत्री पदाचा लक्ष्मी रतन शुक्ला यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. येणाऱ्या काळात ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाची दिशा काय असेल, तसेच पक्षातील वाढती गळती रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.       

संबंधित बातम्या