चीन झुकलं! पॅंगॉन्ग त्सो भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात 

चीन झुकलं! पॅंगॉन्ग त्सो भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात 
Copy of Gomantak Banner - 2021-02-10T173318.599.jpg

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख भागातील गलवान खोऱ्यात झडप झाली होती. व त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळेस भारत व चीन यांच्यातील सैन्य समोरासमोर येत भारताच्या वीस जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. तर चीनच्या बाजूने देखील मोठी हानी झाल्याची माहिती पुढे आली होती. परंतु अजून पर्यंत या संघर्षात नेमके किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनने जाहीर केलेली नाही. तसेच या घटनेनंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य सीमारेषेवर उभे केले होते. मात्र त्यानंतर आता पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्यास सुरवात केल्याची माहिती मिळाली आहे. 

मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख मधील गलवान सरोवराच्या भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. आणि त्यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य सीमारेजवळ आणल्यामुळे परिस्थिती स्फोटक बनली होती. परंतु त्यानंतर दोन्ही देशांनी सीमारेषेवरील वाद शांततेच्या मार्गानेच सोडविण्याला प्राधान्य दिले होते. आणि त्यानुसार दोन्ही देशांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या होत्या. यातील सैन्य कमांडर स्तरावरील चर्चेच्या वेळेस ठरल्याप्रमाणे पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरील भारतीय आणि चीनच्या सैन्याने मागे हटण्यास सुरवात केल्याची माहिती चीनच्या सरकारी मालकीच्या वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिली आहे. 

ग्लोबल टाइम्सने यासंबंधित सोशल मीडियावरील ट्विटरवर लिहिताना, भारत आणि चीन यांच्यातील नवव्या कमांडर पातळीवरील चर्चेत झालेल्या सहमतीनुसार पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याच्या भागातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्यास चालू केल्याचे म्हटले आहे. आणि यास चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला असल्याची माहिती ग्लोबल टाइम्सने आपल्या ट्विट मधून दिली आहे. 

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुमारे अडीच महिन्यांच्या अंतरानंतर 24 जानेवारी रोजी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली होती. या चर्चेचे उद्दिष्ट पूर्व लडाखमधील संघर्षमय ठिकाणांमधून सैन्य मागे घेणे हे होते. तसेच या बैठकीनंतर भारतीय लष्कराने निवेदन जाहीर करताना, चर्चेची नववी फेरी सकारात्मक, व्यावहारिक आणि विधायक झाल्याचे म्हटले आपल्या निवेदनात म्हटले होते. याव्यतिरिक्त सीमाभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सेन्याच्या डीएस्कलेशनवर दोन्ही बाजूंच्या विचारांची देवाण-घेवाण झाली असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली होती.        

दरम्यान, यापूर्वी सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची आठवी फेरी झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. तर, आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते. याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन आधी भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला ठणकावून सांगितले होते. आणि त्यानुसारच आता दोन्ही बाजूंकडील सैन्य मागे घेत असल्याची माहिती चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिली आहे.   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com