चीनकडे नकाशे मागण्याचा विचार

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

सीमेबाबत स्पष्टता येण्यासाठी भारत करणार प्रयत्न
 

नवी दिल्ली

चीनबरोबर नुकताच झाला त्याप्रमाणे सीमावाद भविष्यात टाळण्यासाठी चीन सरकारबरोबर पश्‍चिम सीमेनजीकच्या भागाच्या नकाशांची देवाणघेवाण करण्याचा भारत सरकारचा विचार आहे. यामुळे सीमेबाबतची दोन्ही देशांची भूमिका स्पष्ट होऊन त्यानुसार पुढील धोरण आखणे सोपे जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, सीमावादानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी आपापल्या मूळ ठिकाणी जात असल्याने आताच ही प्रक्रिया करण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
नकाशांद्वारे सीमांबाबतच्या दाव्यांबाबत भूमिका स्पष्ट झाल्यास गस्त घालणे आणि इतर व्यवस्थापन करणे सोपे जाईल, असा भारत सरकारचा विचार आहे. भारताने यापूर्वीही पश्‍चिम भागातील सीमेचे नकाशे चीनकडे मागितले होते. मात्र, सीमावादावर चर्चेच्या २२ फेऱ्या होऊनही त्यांनी केवळ मध्य भागातील सीमेचे नकाशे भारताकडे दिले होते. सीमावादावर तोडगा सध्या तरी शक्य दिसत नसला तरी गलवानमधील घटनेनंतर नकाशे मागण्यास सबळ कारण मिळाले आहे. पश्‍चिम भागातील नकाशे देण्याबाबत चीन करत असलेली टाळाटाळ संशयास्पद असून त्यांना हा भाग जाणूनबुजून तणावग्रस्त ठेवण्याची इच्छा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरून सैन्य माघारीची प्रक्रिया अद्याप सुरु असून यावर भारतीय लष्कराचे बारीक लक्ष आहे. या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तिबेटला निधी
तिबेटी नागरिकांचा तिबेटमधील आर्थिक आणि सांस्कृतिक आधार टिकविण्यासाठी अमेरिका सरकारच्या आंतरराष्ट्रीय विकास निधीतर्फे येथील विजनवासातील सरकारला दहा लाख डॉलरचा निधी मिळाला आहे. या सरकारला प्रथमच अमेरिकेकडून थेट निधी मिळाला असून भारताच्या सहमतीनेच ही प्रक्रिया झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सरकारचे पंतप्रधान लोबसांग सांगाय यांनी या निधीबद्दल अमेरिकेचे आभार मानले आहेत.

देशाच्या भूमीवर पूर्ण ताबा : देस्वाल
भारताच्या भूमीवर आपल्या सुरक्षा जवानांचा संपूर्ण ताबा असून सर्व सीमा सुरक्षित आहेत, असे भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे महासंचालक एस. एस. देस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. पूर्व लडाख भागात भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण होऊन सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ‘देशाच्या पूर्व, पश्‍चिम आणि उत्तर सीमा सुरक्षित आहेत. आपल्या देशाचे सुरक्षा जवान अत्यंत सावध, समर्पित आणि सामर्थ्यवान आहेत. कोणत्याही शत्रूपासून आपल्या सीमेचे रक्षण करण्यास ते पूर्णपणे सक्षम आहेत,’ असे देस्वाल म्हणाले.

संबंधित बातम्या