भारत-चीन मध्ये सैन्य माघारीवरून पुढील आठवड्यात होणार कमांडर स्तरावरील बैठक?

India and China
India and China

भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख मधील सीमारेषेवरून वाद चांगलाच उफाळला होता. आणि त्यानंतर जून महिन्याच्या मध्यास दोन्ही देशांच्या सैन्यात मोठा संघर्ष झाला होता. या संघर्षानंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली होती. परंतु मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनंतर दोन्हीही देशांकडून संबंध सुधारण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तरेकडील सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर यशस्वीरित्या अंमलबजावणी झाल्यानंतर आता उर्वरित भागातील सैन्य मागे घेण्याच्या बाबतीत दोन्ही देशांच्या सैन्यात चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (India-China commander-level meeting likely next week)

भारत आणि चीन यांच्या सैन्यात कोर कमांडर स्तरावरील नवव्या बैठकीत पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून सैन्य मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली होती. व त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने या भागातून आपापले सैन्य मागे घेतले होते. त्यानंतर आता पुढील सैन्य स्तरावरील चर्चेची अकरावी फेरी पुढील आठवड्यात पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. आणि या बैठकीत गोग्रा हाइट्स आणि देप्सांग या मैदानी भागावरून सैन्य मागे घेण्याच्या विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते. मागील आठवड्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या मुत्सद्दी चर्चेनंतर पुढील आठवड्यात दोन्ही बाजूंच्या सैन्यातील कोर कमांडर स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.      

भारत (India) आणि चीन (China) या दोन्ही देशातील सैन्यातील चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी गोग्रा हाइट्स, देपसांग आणि डेमचोक जवळील सीएनसी जंक्शन भागातून सैन्य मागे घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही देशांमधील मुत्सद्दी स्तरावर झालेल्या चर्चेनंतर लवकरच या विषयांवर सविस्तर चर्चा  होण्याची शक्यता आहे. व ही दोन्ही देशांमधील अकरावी बैठक असणार आहे. यापूर्वी, 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांमध्ये चर्चेची दहावी फेरी पार पडली होती. या बैठकीत पॅंगॉन्ग सरोवराच्या परिसरातील आघाडीवरच्या दोन्ही देशांच्या सैन्याच्या तुकड्या सुरळीतपणे मागे घेतल्याची माहिती भारत व चीनने एकमेकांना दिली होती.  

यापूर्वी, सहा नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांमधील चर्चेची आठवी फेरी झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. तर, आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते. याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन आधी भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला ठणकावून सांगितले होते. व नवव्या फेरीत दोन्ही देशांनी यावर सहमत होत सैन्य माघार घेण्यास सुरवात केली होती. मात्र पॅंगॉन्ग त्सो भागातील सैन्य मागे घेण्यात आले असले तरी, काही ठिकाणी चिनी सैन्याने प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. लडाखच्या पूर्व भागातील देपसांग, राकी-नाला आणि डीबीओसारख्या इतर ठिकाणी भारत आणि चीनचे सैन्य अजूनही समोरासमोर उभे आहे. 

दरम्यान, (India-China commander-level meeting likely next week) भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी 24 जानेवारी रोजी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोअर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली होती. तर दोन्ही देशांमधील सैन्याच्या चर्चेची दहावी फेरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीन बाजूच्या मोल्दो येथे झाली होती. दहाव्या बैठकीत पश्चिम क्षेत्रामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने अन्य मुद्द्यांविषयी भारत आणि चीन यांच्यात स्पष्ट आणि सखोल विचारांचे आदानप्रदान झाले असल्याचे भारतीय सैन्याने सांगितले होते.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com