भारत-चीनमध्ये मॉस्कोत चर्चा

प्रतिनिधी
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आज भेटणार

नवी दिल्ली: भारत-चीन दरम्यानचा सीमावाद आणखी चिघळला असताना आज मॉस्को येथे उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत (एससीओ) परराष्ट्रमंत्री परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे मंत्री एस. जयशंकर आणि वांग यी हे एकत्र आलेले पाहायला मिळतील. दुसरीकडे, भारताने सीमेवरील संकट पाहता आपली तयारी सुरू ठेवली असून, हिमालयाच्या डोंगराळ भागात हलक्या मालवाहू हेलिकॉप्टरच्या चाचण्या हवाईदलाने घेतल्या आहेत. 

चिनी सैन्याने ताबारेषेवर एप्रिलमधील यथास्थिती पूर्ववत करण्याबाबत टाळाटाळ केल्यानंतर भारतीय लष्कराने  पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील भागांत सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळविल्याने चीनचा  थयथयाट सुरू झाला आहे. चिनी सरकारी माध्यमांमधून भारताला युद्धाची धमकीही दिली जाऊ लागली आहे.

त्यापार्श्वभूमीवर सीमावादावर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांची ही प्रत्यक्ष पहिलीच भेट असेल. 

सैन्याची जमवाजमव
पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिण भागात भारतीय सैन्याने मोक्याची ठिकाणे काबीज केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनने उत्तर भागातील फिंगर ४ ते ८ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली आहे. 

भारतीय लष्करालाही सीमांच्या सुरक्षेसाठी तुल्यबळ सैन्य तैनात करावे लागले आहे. 

संबंधित बातम्या