भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यास तयार; नवव्या फेरीची चर्चा सकारात्मक  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुमारे अडीच महिन्यांच्या अंतरानंतर रविवारी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली.  

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात पूर्व लडाख मधील गलवान भागात जोरदार धुमश्चक्री झाली होती. यात भारतीय सैन्य दलाच्या वीस जवानांना वीरमरण आले होते. तर चीनच्या सैन्याची देखील मोठी हानी झाली होती. मात्र चीनने नेमके किती सैनिक या झटापटीत मृत्युमुखी पडले याचा तपशील अजूनही जाहीर केलेला नाही. परंतु या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला होता. आणि या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुमारे अडीच महिन्यांच्या अंतरानंतर रविवारी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली.  

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील या चर्चेचे उद्दिष्ट पूर्व लडाखमधील संघर्षमय ठिकाणांमधून सैन्य मागे घेणे हे होते. या बैठकीनंतर भारतीय लष्कराने निवेदन जाहीर केले असून, चर्चेची ही फेरी सकारात्मक, व्यावहारिक आणि विधायक झाल्याचे म्हटले आहे. शिवाय या बैठकीमुळे परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा आणखी वाढला असल्याचे भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तसेच दोन्ही बाजूकडील सैन्य माघार घेण्याच्या दृष्टीने सहमती झाली असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. याव्यतिरिक्त सीमाभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सेन्याच्या डीएस्कलेशनवर दोन्ही बाजूंच्या विचारांची देवाण-घेवाण झाली असल्याची माहिती सैन्याने दिली आहे. 

भारत आणि चीन यांच्यातील ही बैठक रविवारी 11 वाजता सुरु झाली होती. तर रात्री अडीच वाजता ही बैठक संपल्याची माहिती मिळाली होती. तसेच पुढील दहाव्या फेरीतील चर्चेची बैठक लवकरच होणार असल्याचे भारतीय सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.या बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथील 14 व्या कोर्सेचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केले. तर यापूर्वी सहा नोव्हेंबर रोजी आठव्या फेरीची  चर्चा झाली होती. आणि या चर्चेत देखील दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर व्यापक चर्चा केली होती. आणि आतापर्यंत झालेल्या चर्चेत भारताने सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची जबाबदारी चीनवर असल्याचे म्हटले होते.     

याउलट, सातव्या फेरीच्या चर्चेत चीनने पेंगोंग तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याच्या शिखरावरुन भारताने सैन्य मागे घेण्यास म्हटले होते. पण यावर दोन्ही बाजुंनी एकाच वेळी सैन्य माघारी घेण्यासंबंधी भारताने चीनला सांगितले होते. त्यामुळे सध्यातरी पूर्व लद्दाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांतील तणाव कायम असून, मोठ्या थंडीत 50 हजाराहून अधिक भारतीय सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. तर चीननेही एलएसीवर आपले सैन्य मोठ्या संख्येने तैनात केले आहे.      

संबंधित बातम्या