म्यानमार प्रश्नात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका बजावण्याच्या प्रयत्नात?  

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भारताच्या शेजारील देशांपैकी एक असलेल्या म्यानमार मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला लष्कराने बंड करत लोकनियुक्त सरकारला उलथून पाडले.

भारताच्या शेजारील देशांपैकी एक असलेल्या म्यानमार मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला लष्कराने बंड करत लोकनियुक्त सरकारला उलथून पाडले. त्यानंतर म्यानमार मधील जनता रस्त्यावर उतरलेली असून सैन्याने आपल्याच जनतेवर अत्याचार करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत कित्येक जणांचा मृत्यू झालेला आहे. यावर आता भारताने म्यानमारमध्ये कायद्याच्या राजवटीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. (India has said it needs the rule of law in Myanmar)  

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज पत्रकार परिषदेत म्यानमार संबंधित बोलताना, भारत म्यानमार मधील राजकीय कैद्यांच्या सुटकेचा आग्रह धरत असल्याचे सांगितले. तसेच, भारत म्यानमार मधील परिस्थिती सोडविण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा देत असल्याचे अरिंदम बागची यांनी नमूद केले. यानंतर भारत हा कोणत्याही हिंसाचाराचा निषेध करत असल्याचे स्पष्ट करत, कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यावर भारताचा विश्वास असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. शिवाय, भारत हा म्यानमारमधील लोकशाही पुन्हा पूर्ववत करण्याच्या बाजूने उभे असल्याचे अरिंदम बागची यांनी यावेळी अधोरेखित केले. 

तेल उत्पादक 'ओपेक' आणि 'ओपेक इतर' देशांना भारताचे मोठे...

तसेच, आसियान (असोसिएअशन ऑफ साऊथ ईस्ट अशियन कंट्रीज) संघटनेच्या प्रयत्नांसह म्यानमार मधील सद्य परिस्थिती सोडविण्यासाठी कोणत्याही प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. यानंतर, भारत हा म्यानमारच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) संतुलित आणि विधायक भूमिका बजावण्याच्या प्रयत्नात असल्याची महत्वाची माहिती अरिंदम बागची यांनी दिली. याव्यतिरिक्त, म्यानमारच्या सीमेवरील सुरक्षेच्या मुद्दय़ावर कायद्यांनुसार आणि मानवतावादी विचारसरणीप्रमाणे त्यासंदर्भात काम करीत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. 

म्यानमारच्या (Myanmar) सैन्याने 1 फेब्रुवारीला एका वर्षाच्या आणीबाणीची घोषणा करत देशात सत्ता काबीज केली होती. म्यानमार मधील लष्कराने देशात 8 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या कथित फसवणूकीवर कारवाई करण्याचे वचन दिले आहे. लष्कराच्या या कृतीनंतर म्यानमार मधील जनता रस्त्यावर उतरली असून आतापर्यंत 500 हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर 2,600 पेक्षा जास्त लोकांना सैन्याने ताब्यात घेण्यात आले आहे.  

दरम्यान, लष्कराच्या कारवाईनंतर अमेरिका (America) आणि ब्रिटनने (Britain) म्यानमारच्या लष्कराशी संबंधित अनेक व्यक्ती व संस्थांवर तसेच म्यानमारच्या काही संघटनांवर बंधने घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमधील हिंसाचाराचा व्यापकपणे निषेध केला आहे.      

संबंधित बातम्या