जागतिक कल्पक संशोधन निर्देशांकाच्या यादीत भारतची चार क्रमांकाने झेप

पीटीआय
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

जागतिक बौद्धीक संपदा संघटनेने (डब्लूआयपीओ) जाहीर केलेल्या या यादीत भारत ४८ व्या क्रमांकावर आला आहे. गेल्या पाच वर्षांत कल्पक संशोधनात भारताने बरीच प्रगती केल्याचे दिसून आले आहे. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आलेली असतानाही भारताने जागतिक कल्पक संशोधन निर्देशांक, २०२० च्या यादीत चार क्रमांकाने वर झेप घेत पहिल्या पन्नासात स्थान पटकावले आहे. जागतिक बौद्धीक संपदा संघटनेने (डब्लूआयपीओ) जाहीर केलेल्या या यादीत भारत ४८ व्या क्रमांकावर आला आहे. गेल्या पाच वर्षांत कल्पक संशोधनात भारताने बरीच प्रगती केल्याचे दिसून आले आहे. 

जागतिक कल्पक संशोधन निर्देशांक यादीत स्वित्झर्लंड प्रथम स्थानावर असून त्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षांत भारत, चीन, फिलीपीन्स आणि व्हिएतनाम या देशांनी बरीच प्रगती केली असून हे चारही देश आता पहिल्या पन्नासात आहेत. जागतिक पातळीवर कल्पक संशोधनाला वेग आला असला तरी कोरोना संसर्गाचा त्यावर निश्‍चितच परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी संशोधन प्रक्रियेत अडथळे आले तर आरोग्य क्षेत्रामध्ये मात्र प्रचंड संशोधन झाले. 

गेल्या काही वर्षांत श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या प्राधान्यक्रमात फारसा फरक पडला नसला तरी आशियातील भारत, चीन, फिलीपीन्स आणि व्हिएतनामसारख्या देशांनी संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचे ‘डब्लूआयपीओ’ने म्हटले आहे. 

पहिल्या दहा जणांमध्ये आशियातील दक्षिण कोरियाने प्रथमच स्थान मिळवले असून सिंगापूर आधीच आठव्या क्रमांकावर आहे. जागतिक कल्पक संशोधन निर्देशांकात पहिल्या तीस देशांमध्ये सर्वच देश उच्चउत्पन्न गटातील असून केवळ चौदाव्या क्रमांकावर असलेला चीन मध्यम उत्पन्न गटातील आहे. या यादीत मलेशिया ३३ व्या क्रमांकावर आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या