कोरोनामुळे स्थिती चिंताजनक: तीन दिवसांत दररोज ८० हजारांहून अधिक नवे रुग्ण

पीटीआय
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे स्थिती चिंताजनक; मृत्युदरात घट झाल्याचा दावा

नवी दिल्ली: कोरोना संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत असून, देशात मागच्या तीन दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ८० ते ८६ हजारांचा टप्पा पार करून गेली आहे. मागील तीन दिवसांत रोज विक्रमी म्हणजे किमान ८० हजार व त्यापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत.
 
मागील केवळ १३ दिवसांत तब्बल १० लाखांनी रुग्णसंख्या वाढणे हा वाढत्या चिंतेचा विषय असतानाच मृत्यूदर घटून १.७३ झाल्याचे केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. 

देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्राचे मत आहे. 

तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झालेली आहे. 

याचा सातत्याने इन्कार करणाऱ्या केंद्र सरकारकडून गेला आठवडाभर या मुद्यावर बोलण्याचे टाळण्यात आल्याचे दिसते. १३० कोटी लोकसंख्येपैकी आतापावेतो फक्त ४ कोटी ७७ हजार चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. रूग्णसंख्येबाबत अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ सर्वाधिक ४० लाखांहून जास्त सक्रिय रूग्ण असणाऱ्या भारतातील परिस्थिती दर महिन्यागणिक भयावह होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार शनिवार सकाळपर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ७७.२३ पर्यंत वाढले आहे. रुग्णांची संख्या १० लाखांहून २० लाखांपेक्षा जास्त होण्यास केवळ २१ दिवसांचा काळ लागला आहे.

दिल्लीत पुन्हा उद्रेक 
दिल्लीत कोरोनाचा उद्रेक व मास्कसह आरोग्य नियमावली न पाळणाऱ्या बेजबाबदार लोकांचीही संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते सरकारला रुग्णांच्या वाढत्या आकड्यांची नव्हे तर लोकांचे जीव कसे वाचतील याची चिंता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून घबराट उडवू नये, असेही त्यांनी आवाहन केले. 

संबंधित बातम्या