तिबेटच्या मुक्‍तीसाठी भारताने पुढाकार घ्यावा
India should take initiative for the liberation of Tibet

तिबेटच्या मुक्‍तीसाठी भारताने पुढाकार घ्यावा

म्हापसा: मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून भारत सरकारने तिबेटीयन लोकांची कैफियत समजून घ्यावी व हा प्रश्‍न संयुक्‍त राष्ट्र महासंघाच्या व्यासपीठावर मांडून तिबेटला चीनपासून मुक्‍ती मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मूळ तिबेटीयन असलेल्या नागरिकांनी कळंगुट येथील राज्यव्यापी मेळाव्यात केली. उपस्थितांनी हात उंचावून या मागणीला पाठिंबा दर्शवविला.

कळंगुट येथील तिबेटीयन मार्केटच्या आवारात ‘तिबेटीयन वेल्फेअर असोसिएशन, गोवा’ या संघटनेने ६१ व्या तिबेटीयन राष्ट्रीय क्रांतिदिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन केले होते.
तिबेटीयन जनतेचे गोव्यातील नेते श्री. चॉपेल यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले, की चीनने १० मार्च १९५९ रोजी गैरमार्गाने तसेच अनैतिक तथा अमानवीय पद्धतीने तिबेटवर कब्जा मिळवल्याच्या दिवसांपासून आजपर्यंत तिबेटीयन जनता मूकपणे हा अन्याय सहन करीत आहे. तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य मिळावे ही आमची दीर्घकाळची मागणी असून चीनपासून मुक्‍ती मिळावी या उद्देशाने आमचा लढा शांततापूर्ण मार्गाने सुरूच आहे.

ते पुढे म्हणाले, आम्ही भारतीयांना आमचे गुरू असल्याचे मानतो. कारण आम्हा बौद्धधर्मीयांचे प्राणप्रिय दैवत गौतम बुद्ध मूळचे भारतातीलच आहेत. आम्ही भारतात केवळ पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यास आलेलो नाही, तर भारताकडून आम्हाला साहाय्य मिळावे या हेतूने भारतीयांसमोर याचना करायला आलो आहोत. भारतात लोकसंख्येचा प्रश्‍न भेडसावत असल्याने आम्हाला भारतात कायम राहायचे नाही. चीनपासून तिबेट स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही आमच्या मूळ देशात जाणारच आहोत.

‘तिबेटीयन वेल्फेअर असोसिएशन, गोवा’च्या अध्यक्ष श्रीमती लॅडन यांनी सांगितले, आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी अधिकार हवे आहेत. त्यामुळे भारत सरकारने जागतिक स्तरावर तिबेटच्या स्वातंत्र्याचा प्रखरतेने पुरस्कार करावा. अन्य राष्ट्रांकडून मदत मिळेल अशी आम्ही अपेक्षाच करीत नाही; भारत हेच आमचे केवळ एकमेव आशास्थान आहे. भारतात असलेल्या तिबेटीयन निर्वासितांना भारत हा एकमेव आधार असल्याने आम्ही भारताकडे आशाळभूत नजरेतून पाहात आहोत.

संघटनेचे पदाधिकारी सिरिंग चॉपेल मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले, तिबेटीयन राष्ट्रीय क्रांतिदिन हा तिबेटच्या इतिहासात अतिशय दु:खभरीत काळा दिवस आहे. कारण त्या दिवशी चीनकडून हजारो नि:शस्त्र तिबेटीयन्सना मशिनगनच्या आधारे ठार करण्यात आले. तिबेटी जनतेकडे कोणतीही शस्त्रास्त्रे नसल्याने त्यांना कोणताही प्रतिकार करता आला नाही. तिबेटीयन शांततापूर्ण मार्गाने जीवन जगणारे असल्याने आताही आम्ही केवळ मौखिक निषेध व्यक्‍त करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. कारण आम्ही हतबल झालो आहोत.

या असोसिएशनचे गोवाभर सुमारे १८० सदस्य असून गोव्यात तिबेटीयन राष्ट्रीय क्रांतिदिन १९८५ पासून सातत्याने साजरा केला जातो. गोव्यात कळंगुट, बागा व वास्को येथे तिबेटीयन मार्केट कार्यरत आहेत. त्या बाजारांत प्रामुख्याने हस्तकलेच्या वस्तू, ज्वेलरी, रेडिमेड कपडे इत्यादी साहित्याची विक्री केली जाते.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com