पाकिस्तानसाठी दहशतवादी हुतात्मा

पीटीआय
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

काश्‍मीर मुद्द्यावरून ‘यूएन’मधील कार्यक्रमात भारताने सुनावले

न्यूयॉर्क: पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून जगभरात ओळखला जातोच. शिवाय, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा आणि त्यांना हुतात्म्यांचा दर्जा देणारा देश आहे, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला पुन्हा सुनावले व भारताविरोधातील खोट्या माहितीचे खंडन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी रात्री एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्याचा समाचार घेताना संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मोहिमेच्या पहिल्या सचिव विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तान हा ‘दहशतवाद्यांचे आश्रयस्थान’ असल्याचे सांगून पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना हुतात्माही म्हटले जाते. तसेच तेथील अल्पसंख्याक धर्माच्या व वंशाच्या लोकांचा कायम छळ केला जातो, असा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देशाच्या संसदेत अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा हुतात्मा असा उल्लेख केला होता. तो धागा पकडून मैत्रा यांनी काल पाकिस्तानवर उलटवार केला. या कार्यक्रमात कुरेशी यांनी भाषणात पुन्हा एकदा काश्‍मीरचा सूर आळवला. त्यानंतर भारताने उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर केला.

राष्ट्रसंघाने विश्‍वास कमवावा : मोदी 
ठोस सुधारणांच्या अभावी संयुक्त राष्ट्रांसमोर विश्‍वासार्हतेचे संकट निर्माण झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. ‘यूएन’च्या विशेष उच्चस्तरीय सभेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदी म्हणाले की, आता बदललेल्या जगात वस्तुस्थितीचे आकलन करून, सर्व सदस्य देशांचे मत लक्षात घेऊन सुधारणा कराव्या लागतील. संरचनेत बहुपक्षीय व्यवस्थात्मक सुधारणांची गरज आहे.
 

संबंधित बातम्या